बीड जिल्ह्यामध्ये शेतकयांच्या बांधावर, शेतात काही ठिकाणी गोगलगायी आढळून येत आहेत. गोगलगायी नष्ट करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यासाठी ४१५० किलो मेटाल्डीहाईड या कीटकनाशकाचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज उरली नाही.
कृषी विभागातर्फे मेटाल्डीहाईड वाटपासाठीचे नियोजन केले आहे. सदरील साठा संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच तालुका बीज गुणन केंद्र व शासकीय फळ रोपवाटिका याठिकाणी ठेवला आहे. त्यातून २०७५ एकर एवढ्या क्षेत्राचे सहज संरक्षण होईल.
गोगलगायीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पेरलेल्या सोयाबीन शेताची विशेषतः बांधाचे निरीक्षण करावे, बांध स्वच्छ ठेवावे, बांधावर गोगलगायी आढळल्यास शेतात संध्याकाळच्या वेळेस जागोजागी गवताचे ढीग अथवा गुळाच्या पाण्यामध्ये रिकामे बारदाने भिजवून ठेवावे.
सकाळी त्या ढिगांखाली लपलेल्या गोगलगायी जमा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. नियंत्रणात्मक उपाययोजना म्हणून मेटाल्डीहाईड या कीटकनाशकाच्या गोळ्या २ किलो प्रती एकर या प्रमाणात बांधाच्या नजीकच्या भागात किंवा प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात वापराव्यात. जेणे करून गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखला जाईल. कीटकनाशक हे मुरमुऱ्यांना शेतामध्ये फेकू नये, त्याने पशु-पक्षी यांना हानी होऊ शकते, असाही सावधानतेचा इशारा दिला आहे.
कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करावा !
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी स्थानिक क्षेत्राचे, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क करावा तसेच अधिक तांत्रिक माहितीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा किंवा गेवराई तालुक्यातील खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.
हेही वाचा - खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष