Join us

डॉ. पंदेकृविचा उपक्रम : गावातील शेतमालावर होणार गावातच प्रक्रिया; शेतकऱ्यांसाठी कितपत फायदेशीर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 3:59 PM

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अकोल्यातील एका खासगी कंपनीसोबत करार केल्याने आता गावातील शेतमालावर होणार गावातच प्रक्रिया होणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार. वाचा सविस्तर

अकोला

शेतीउपयोगी आधुनिक व शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी आधुनिक यंत्रे विकसित करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अकोल्यातील एका खासगी कंपनीसोबत १७ सप्टेंबर रोजी सामंजस्य करार केला आहे. 

संयंत्र विकसित करण्यासाठी कृषी विद्यापीठ कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान केंद्र या कंपनीला तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. विदर्भात तूर पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, इतरही डाळवर्गीय पिके शेतकरी घेतात.

परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांनी गावातील शेतमालावर गावातच प्रक्रिया उद्योग उभारून आर्थिक, सामाजिक बदल व्हावा, असा कृषी विद्यापीठाचा मानस आहे. 

कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान केंद्राने आतापर्यंत २३ विविध संयंत्रे विकसित केली असून, ३२ निर्मात्यांसोबत करार केला आहे. यातून दहा हजारांहून अधिक डाळमिल यंत्र विकसित करण्यात आली असून, देश, विदेशात ही यंत्रे पोहोचली आहेत. 

यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी.बी. उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. काळबांडे, डॉ. आर.एम. गाळे, प्रमोद पाटील, महादेव पुंडकर, कापणीपश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी.एच. बकाणे आदींची उपस्थिती होती.

गावपातळीवर शेतकरी झाले उद्योजक

कृषी विद्यापीठाच्या कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान केंद्राने या यंत्राच्या माध्यमातून राज्यातील विविध ३२ गावांमध्ये प्रक्रिया उद्योग उभारून शेतकऱ्यांना उद्योजक केले असल्याचे यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी या कराराप्रसंगी माहिती देताना सांगितले.

टॅग्स :शेती क्षेत्रअकोलाशेतकरीशेतीपीक