Join us

DR. pdkv : डॉ. पंदेकृवित येत्या शुक्रवारपासून शिवारफेरी ; केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री राहणार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 4:39 PM

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त २० ते २२ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसीय विदर्भस्तरीय शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. (DR. pdkv)

अकोला  येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त २० ते २२ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसीय विदर्भस्तरीय शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत शिवारफेरीचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती राहणार असून, राज्याचे कृषिमंत्री धनजंय मुंडे हे अध्यक्षस्थानी राहतील. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, खासदार अनुप धोत्रे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहसंचालक डॉ. हिमांशू पाठक, कृषी सचिव जयश्री भोज, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, परभणीच्या स्व. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शनिवारी आमिर खान अकोल्यात 

शिवारफेरी निमित्त पाणी फाउंडेशनचे संस्थापक तथा सिने कलावंत आमिर खान यांच्या उपस्थितीत शनिवार २१ सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवारफेरीचा समारोप होणार आहे.

कृषी विद्यापीठाचा स्थापना दिवस

• महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत वसंतराव नाईक सरकारने अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ ला कृषी विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापीठास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे.

• विद्यापीठ कायदा १९८३ अंतर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यात कृषी शिक्षण, शोध आणि बीज कार्यक्रम आदीचे कार्य विद्यापीठावर सोपवण्यात आले आहे.

• परंतु सप्टेंबर महिन्यात पिके उत्तम स्थितीत असतात, यामुळे ऑक्टोबरऐवजी सप्टेंबर महिन्यात शिवारफेरी घेण्याचा निर्णय डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी घेतला आहे. त्यासाठी उत्तम असे शिवार फुलविले असून, शेतकऱ्यांना ही एक पर्वणी आहे.

नवे वाण उपलब्ध

यंदाच्या शिवारफेरीत गळीत धान्य, दाळवर्गीय, तृणवर्गीय पिकासह फुले, फळे व विविध तंत्रज्ञान, वाण बघायला मिळणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रअकोलाशेतकरीशेती