Orange Market :अकोला : विदर्भातील गोड संत्रा दिल्लीसह इतर राज्यांतील बाजारपेठांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करून शाश्वत विदर्भ विकासात भरीव योगदान देणार असल्याचे आश्वासक प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, अचलपूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभावी 'संत्रा विपणन' या विषयावर अचलपूर तालुक्यातील सालेपूर गावच्या आशिष कळमकर यांच्या संत्रा बागेत आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिल्ली आणि बंगळुरूच्या बाजारपेठेसाठी लिंबूवर्गीय फळांची काढणी, प्रतवारी, पॅकिंग, मेणाचा लेप आणि वाहतूक करण्याचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास देखील वाढला असल्याचे सांगितले.
डॉ. गडाख यांनी ऑक्टोबर महिन्यात अचलपूरच्या शेतकऱ्यांकडून लिंबूवर्गीय फळांचा एक ट्रक भरून दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.या महत्त्वाकांक्षी विपणन योजनेने देशभरातील चांगले मार्केट विदर्भातील संत्रा पिकांसाठी उपलब्ध होत संत्रा बागायतदारांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.प्रत्यक्ष संत्रा फळबागेत आयोजित या कार्यशाळेच्या प्रसंगी संत्रा पिकांच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली तथा संत्रा फळगळ, फायदेशीर उत्पादन तंत्रज्ञान, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग आदींबाबत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.
कमी दर्जाच्या फळांवर नांदेडमध्ये प्रक्रिया
विविध बाजारपेठांमध्ये लिंबूवर्गीय फळांचा एक ट्रक लोड करण्याची योजना असून, कमी दर्जाची फळे ('सी' आणि 'डी' ग्रेड) नांदेड येथील सह्याद्री ॲग्रो प्रोसेसिंग युनिटला पाठवली जाणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.हा उपक्रम डॉ. पंदेकृवि, अकोलाच्या विदर्भातील एक मजबूत फळ विपणन साखळी विकसित करण्याच्या प्रयत्नांचा भाग असून, त्यामुळे शेतकरी गटांना थेट ग्राहकांशी जोडले जात आहे.