राज्याचे माजी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची अचानक बदली करण्यात आली असून धडाडीचे सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी कृषी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारली आहेत. काल ते सेवेत रुजू झाले आणि काहीच वेळ न दवडता त्यांनी कामाला सुरूवात करत दुष्काळ नियंत्रण समितीची बैठक घेतली. त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून कृषी विभागातील संचालकांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. गेडाम यांची काल पदभार स्विकारला आणि लगेच कामाला सुरूवात केली.
काल (ता.२०) त्यांनी आयुक्त कार्यालयात आल्यानंतर लगेच दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेतली. या समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे असल्याने त्यांनी राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य शासनाने कार्यान्वित केलेल्या जिल्हा समितीने दुष्काळासंदर्भात सादर केलेल्या अहवालाचे मुल्यांकन करून त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठवला जाणार आहे. जिल्हापातळीवरील दुष्काळासंदर्भातील अहवालाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सुचनाही आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिल्या आहेत.
कोण आहेत प्रवीण गेडाम?
- डॉ. प्रवीण गेडाम हे २००२ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून एमबीबीएस ही पदवी घेतलेली आहे. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर २००५ साली त्यांची जळगावच्या महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जळगाव महापालिकेचे आयुक्त, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूरचे जिल्हाधिकारी, धाराशिवचे जिल्हाधिकारी, भूजल सर्वेक्षणचे आयुक्त, परिवहन आयुक्त अशा पदांवर त्यांनी दमदारपणे काम करत भ्रष्ट कारभाराला आळा घातला आहे. त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्या अनेकदा बदल्या झाल्याचंही बोललं जात होतं.
सुनील चव्हाण यांची जलसंधारण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती
जलसंधारणाचा चांगला अभ्यास असणारे सुनील चव्हाण यांची मृद आणि जलसंधारण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागाच्या सचिवपदाची सुत्रे सध्या एकनाथ डवले यांच्याकडे होती.