Join us

पिण्याचा पाण्याचा प्रश्न, तिथे फुलले उसाचे मळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 5:20 PM

सांगली जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्र : पाच वर्षात ६० टक्के वाढले

 सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात सिंचन योजनांचे पाणी पोहोचल्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वाळवा वर्षांत त्यात तब्बल ६० टक्के वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये एक लाख २४ हजार २६९ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी १९ हजार ८५८ हेक्टरने वाढ झाली आहे. सध्या जेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे चित्र असताना तेथे उसाचे मळे फुलताना दिसत आहेत.

जिल्ह्यात नदीकाठासह दुष्काळी पट्ट्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०२३-२४ साठी गाळपासाठी एक लाख ४४ हजार १२७.९६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध  होणार आहे. ही आकडेवारी कृषी विभागाच्या अहवालातील आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १९ हजार १८५८ हेक्टर क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून उसाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसत आहे. चार वर्षे अतिवृष्टीचा फटका उसाला  बसला तरी शेतकरी लागवडीसाठी पुढे येत आहेत. दुसऱ्या बाजूला दुष्काळी भागात पिण्यासाठी पाण्याची टंचाई असतानाही सिंचन योजनेवर शेतकरी उसाचीच लागवड करताना दिसत आहेत.

दुष्काळी भागात उसाची उत्पादकता फारच कमी असल्याचे संशोधनातून दिसत आहे. सर्वांत कमी आटपाडी तालुक्यात हेक्टरी सरासरी ७२ टन, जत ८० टन, कवठेमहांकाळ तालुक्यात ७४ टनाची उत्पादकता आहे. शिराळा तालुक्यात पाऊस चांगला असूनही तेथे हेक्टरी ८० टनाचेच उत्पादन आहे. सर्वाधिक उत्पादकता वाळवा तालुक्यात हेक्टरी ११० टनापर्यंत आहे. दुष्काळी भागात ऊसाचे क्षेत्र वाढत असताना उत्पादकता प्रचंड घटत आहे.

अन्य पिकांना ठोस उत्पन्नाची हमी नसल्यामुळे ऊस पीक घेतले जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव, कडेगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. तेथे सध्या खरिपाची पेरणी नाही. पण उसाची नवीन लागण मात्र जोरात सुरू आहे.

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेती