Crip Subsidy : खूप दिवसांपासून रखडलेले ठिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषी विभागाने वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने या अनुदानासाठी १२३ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची बचत व्हावी, शेतकऱ्यांनी सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी ठिबक सिंचन अनुदान योजना राबवण्याचे ठरवले होते. ही योजना राबवली गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभातून ठिबक सिंचन शेतात बसवले. पण या अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने विक्रेते आणि डीलर यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता.
निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने आता या अनुदानासाठी निधी उपलब्ध करून दिला असून २०२१-२२ मध्ये ठिबक संच घेतलेल्या शेतकऱ्यांना ६२ कोटी रूपये, २०२२-२३ मध्ये ठिबक संच घेतलेल्या शेतकऱ्यांना ३० कोटी रूपये आणि २०२३-२४ मध्ये ठिबक संच घेतलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. तर सर्वाधिक रक्कम ही जळगाव जिल्ह्यासाठी जाणार असून येथील शेतकऱ्यांना ३१ कोटींचे अनुदान मिळणार आहे.
राज्य सरकारने १२३ कोटींचा निधी मंजूर केला असला तरी हा निधी केंद्र शासनाच्या योजनांकरता पूरक निधी म्हणून वापरला जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे ठिबकचे बऱ्याच दिवसांपासून रखडलेले अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.