सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात तुम्ही गेलात तर एखाद्या शेतजमिनीच्या तुकड्यावर ड्रोन घिरट्या घालताना दिसेल, त्याचा रिमोट कंट्रोल शेतामध्ये उभ्या एखाद्या सर्वसामान्य महिलेच्या हाती असेल.
ड्रोनच्या माध्यमातून शेतात कीटकनाशक फवारणी करणे, जमिनीचे मोजमाप करणे, सर्वेक्षण अशा कामांकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या १२ महिलांनी बंगळुरु येथून ड्रोन पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले.
शेतीच्या कामाशी निगडित या प्रशिक्षणामुळे या महिलांमधील आत्मविश्वास गगनात ड्रोनसारखा भरारी घेऊ लागला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांनी या महिलांना प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
ड्रोन पायलट झालेल्या रूचिता जगताप म्हणाल्या की, त्या अंबरनाथ येथील राहटोली तालुक्यातील रहिवासी आहेत. बी कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या कॅनरा बँकेसाठी बँक सखी म्हणून कार्यरत आहेत. ड्रोन पायलट होण्याकरिता त्यांना इंजिनिअरिंगचे धडे गिरवावे लागले. हा अनुभव वेगळाच होता.
पीच फॉरवर्ड व तत्सम शब्द पहिल्यांदाच कानावर पडले. ड्रोन टेकऑफ करण्यापासून ते लँड करण्यापर्यंत, ड्रोनला वरच्या वर कसे शेप म्हणजे आकार द्यायचे, ड्रोन सर्कलमध्ये ठेवून शेतावर कीटकनाशकांची फवारणी कशी करायची, अशा वेगवेगळ्या बाबींचे प्रशिक्षण दिले गेले. ड्रोन उडवण्याच्या निमित्ताने नवीन काही शिकायला मिळाले. कीटकनाशक फवारणीच्या वेळी हातमोजे घालून फवारणी केली, असे जगताप यांनी सांगितले.
आठ दिवसांचे प्रशिक्षण• वांगणी, ता. अंबरनाथ येथील प्रणाली मोने म्हणाल्या की, त्या बीकॉम, बीसीए झालेल्या आहेत. त्यांना ड्रोन पायलट होण्यासाठी कॉल लेटर मिळताच त्यांनी घरच्या मंडळींना विश्वासात घेऊन प्रशिक्षणासाठी तयारी दाखवली. बंगळुरुला प्रशिक्षणासाठी गेल्यावर भाषेच्या समस्येमुळे पहिला दिवस अडचण जाणवली. थोडी तारांबळ उडाली; पण ट्रेनरनी हिंदी भाषेत समजावून सांगितले.• आठ दिवसांच्या या प्रशिक्षण कालावधीत आम्ही ड्रोन पायलटचे मूलभूत ज्ञान आत्मसात केले. शेतीच्या कामासाठी आम्हाला उमेदकडून ड्रोन पायलटचे काम दिले जाणार आहे.
अनुदान देण्याची गरजड्रोनच्या पात्यांना वेग असल्यामुळे त्यापासून गंभीर दुखापत होण्याची भीती असते. शेतामध्ये फवारणी करीत आम्हाला पुढील संधी प्राप्त झाली आहे. ड्रोनच्या खरेदीसाठी शासनाकडून ८० टक्के कर्ज व २० टक्के पदरची रक्कम खर्च करावी लागणार आहे. शासनाने या खरेदीसाठी अनुदान देण्याची गरज आहे.
जीवनोन्नती अभियानांतर्गत आम्हा महिलांना ड्रोन पायलट प्रशिक्षण मिळाले. शेती, आरोग्य, विविध सव्र्व्हे करण्यासाठी याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. ड्रोन प्रशिक्षणामुळे तांत्रिक प्रशिक्षण आम्हाला उत्तम देण्यात आले. आम्हा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, असे कल्याणच्या जीत स्वयसहाय्यता समूहाच्या दीपाली तुपे यांनी सांगितले.
प्रशिक्षणामुळे या महिला रिअल इस्टेट, शेती, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण आणि बांधकाम, सुरक्षा अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार आहेत. जि.प.ने ड्रोन पायलेट प्रशिक्षणासाठी सहा लाख ५२ हजारांची तरतूद केली होती. - छाया शिसोदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
अधिक वाचा: आता शेतीकामात महिलांचे कष्ट होतील कमी; वापरा ही अवजारे