Join us

Drone Favarni : मजुरांची अडचण दूर ड्रोनच्या माध्यमातून अवघ्या ७ मिनिटात एक एकर फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:24 AM

सध्या शेती हायटेक होत आहे. बदलते तंत्रज्ञान शेतकरी आता आपल्या उशाशी ठेवत आहेत. पूर्वी मजुरांवर अवलंबून असणारे शेतकरी आता एका क्लिकवर शेती करायला लागले.

बापू नवलेकेडगाव : सध्या शेती हायटेक होत आहे. बदलते तंत्रज्ञान शेतकरी आता आपल्या उशाशी ठेवत आहेत. पूर्वी मजुरांवर अवलंबून असणारे शेतकरी आता एका क्लिकवर शेती करायला लागले.

दिवसेंदिवस अशा स्वरूपाचा बदल ग्रामीण भागात होणारच आहे हे ओळखून शेतकऱ्यांनी आता नवनवीन तंत्रज्ञान अवलंब व्हायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नानगाव परिसरातील अनेक शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून ऊस व इतर मोठ्या पिकांवर अत्यंत कमी वेळेत कीड नियंत्रणासाठी फवारणी करत आहेत.

ड्रोन एकावेळी १० लिटर औषध वाहून नेऊ शकतो, सोबत त्याचे स्वतःचे वजन १९ किलो असते. त्याला समोर व मागच्या बाजूला सेन्सर असतो, अडथळा आल्यास लगेच समजते. खालच्या बाजूला लक्ष देण्यासाठी तीन मीटरपर्यंतचे तत्काळ लक्षात येईल असे सेन्सर असते.

सर्व प्रकारचे पाण्यात विरघळणारे कीड नियंत्रण टॉनिक अळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीचे विविध औषधे सहजतेने मारता येतात. सुरुवातीला जमिनीचे मॅपिंग करून घ्यावे लागते.

औषधाचे व्यवस्थित मिश्रण केल्यानंतर ड्रोन हवेत उडवला की अवघ्या ७ मिनिटात एक एकर एवढे क्षेत्र औषधाने फवारले जाते. सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोनला कॅमेरा बसवलेला असतो. ड्रोन रिचार्जेबल बॅटरीवर असल्यामुळे एकावेळी किमान दहा ते बारा एकर क्षेत्र फवारले जाऊ शकते, शुद्ध पाणी वापरावे लागते.

शेतकऱ्यांची होणारी फरपट थांबली- एका एकराला जास्तीत जास्त ६०० रुपये खर्च येतो. मजुराअभावी शेतकऱ्यांची होणारी फरपट ड्रोनच्या उपलब्धतेमुळे कमी झाल्या असल्याचे चर्चा सध्या शेतकरी करत आहेत.या ड्रोनची किंमत १५ लाख रुपये असून, शासनाकडून यावर ५०% सबसिडी मिळते.परिसरात असणाऱ्या ऊस, मका, गहू, कोबी, फ्लॉवर त्याचबरोबर वेगवेगळ्या फळबागा यावर योग्यवेळी फवारणीसाठी या परिसरात अनेक शेतकरी उपयोग करून घेत आहेत.- शेतकऱ्यांनी मजुरांची वाट न पाहता एकत्रित येऊन ड्रोनची खरेदी करू शकतात. कृषी विभागाकडूनही यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

मी ड्रोन चालवण्याची मान्यता व प्रशिक्षण घेतले. वेळेची बचत, शेतीचे योग्य नियोजन, समप्रमाणात औषधाचा वापर करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहे. ड्रोन रिचार्जेबल असल्यामुळे अत्यल्प खर्चात फवारणी होत आहे. - पवन खळदकर, युवा शेतकरी, नानगाव

ड्रोनमुळे कमी वेळेत व अल्प खर्चात फवारणी होते. सध्या शेतीत असे नवनवीन प्रयोग युवा शेतकऱ्यांकडून होणे गरजेचे वाटते. त्यातून बऱ्याच समस्या सुटतात, कमी कष्टात उत्पादनात वाढ होते. - महेश रूपनवर, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक, दौंड

टॅग्स :शेतीशेतकरीपीककीड व रोग नियंत्रणपीक व्यवस्थापनदौंड