मालकी हक्काच्या शेतात ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करत असताना शेजारच्या शेतकऱ्यांनी लावलेले सव्वा एकर भेंडीचे पीक जळाले. याची विचारणा करताच शिवीगाळ केल्याने बीड जिल्ह्याच्या आष्टी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील वाकी येथील परसराम जगन्नाथ आस्वर याची सर्व्हे नंबर ९३ मधील शेती ही येथील दादा आस्वर हे वाट्याने करत आहेत. ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दादा आस्वर हे शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता सव्वा एकर भेंडीचे पीक जळालेले दिसले.
त्यांनी शेताशेजारील संदीप आस्वर, सुरेश आस्वर, सपना आस्वर यांना विचारले. तुमच्या शेतात ड्रोनने फवारणी करताना माझे भेंडीचे पीक जळाले आहे. तुम्ही जळालेल्या पिकाचा खर्च देऊन टाका, असे म्हटल्यावर त्यांनी तुम्ही पीकविमा भरा, आम्ही खर्च देणार नाही.
तुला काय करायचे करून घे असे म्हणत तिघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सव्वा एकर भेंडीचे पीक जाळून नुकसान केल्याने सुरेश नारायण आस्वर, संदीप सुरेश आस्वर, सपना संदीप आस्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.