Join us

Drone Technology In Agriculture : शेतकऱ्यांनो, तुम्हाला ड्रोन शिकायचेय, मग आजच करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 2:42 PM

सारथी संस्थेच्या वतीने राबवली जात आहे महत्त्वपूर्ण योजना, अनेकांना ड्रोन हाताळण्याची संधी झाली उपलब्ध वाचा सविस्तर (Drone Technology In Agriculture)

Drone Technology In Agriculture :

बीड छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानक विकास संस्था (सारथी) प्रायोजित शेतकरी व युवक युवतींना परभणी व राहुरी येथील कृषी विद्यापीठात ड्रोन पायलटचे निशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सदरील प्रशिक्षण कालावधी ७ दिवसीय व १८० दिवसीय, अशा दोन प्रकारांत आहे. प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानक विकास संस्था (सारथी) पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीतील मान्य ठरावानुसार राज्यातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील शेतकरी, युवक-युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षण व प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स ऑन ड्रोन इन ॲग्रीकल्चर प्रशिक्षण व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्यानुसार शेतकरी, युवक-युवती यांच्याकडून २० सप्टेंबर रोजी सांयकाळी ६:१५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर २३ सप्टेंबरपर्यंत सारथी संस्थेस सर्व कागदपत्रे पाठवावी लागणार आहेत.त्यामुळे युवक-युवतींनी वेळेवर अर्ज दाखल करावी लागणार आहेत. या संबंधित सर्व माहिती किंवा इतर सूचनाही लिंकवरच दिली जाणार आहे. शेतकरी, युवकांनी sarthi.mkcl.org/#/login या लिंकवर जाऊन नोंदणी करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचे महत्त्व वाढू लागले आहे. ड्रोनच्या माध्यमातून पिकावर फवारणी केली जात आहे. तसेच पुढील काळात ड्रोनचा वापर विविध कामासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे युवकांना ड्रोनचे प्रशिक्षण भविष्यात नक्कीच लाभदायक ठरणार आहे.

काय आहे लाभार्थी पात्रता

लाभार्थी अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या प्रवर्गातील असावा. त्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांवर नसावे, ७ दिवसीय प्रशिक्षणाकरिता अर्जदार किमान १२ वी उत्तीर्ण असावा. १८० दिवसीय प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स ऑन ड्रोन इन ॲग्रीकल्चर प्रशिक्षणाकरिता अर्जदार हा किमान विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. यापूर्वी सारथी, पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ घेतलेला नसावा.

७ दिवसीय व १८० दिवसीय प्रशिक्षण

सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना राबवली जात आहे. परभणी व राहुरी विद्यापीठात ७ व १८० दिवस निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थीचे शुल्क प्रशिक्षणार्थीच्या वतीने सारथी संस्थेद्वारे अदा करण्यात येणार आहे. १८ ते ४० वयोगटातील व्यक्त्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतील.

तर अपात्र व्हाल

• कागदपत्रे अपूर्ण असणे, विहित मुदतीत अर्ज सादर न करणे, ऑनलाइन अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरणे चुकीच ठरेल.

• हमीपत्रातील नियमांची उल्लंघन केल्यास निवड प्रक्रिया, आर्थिक सहाय्याचे स्वरूप निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा सारथी संचालकांना असेल.

• विहित नमुन्यातील अर्ज हा Sarthi-maharashtragov.in या लिंकवर उपलब्ध आहे.

• लाभार्थ्यांनी वेळेवर अर्ज भरुन पाठविले नाहीत तर अर्ज बाद ठरणार आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनातंत्रज्ञानशेतकरीशेती