Join us

Drone Technology in Agriculture : वेळ अन पैशाची बचत करणारी ड्रोन फवारणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 2:45 PM

Drone Technology in Agriculture : गेल्या काही दिवसापासून सतत पावसामुळे पिकाला फवारणी करण्यास विलंब झाला. त्यातच पावसाने जरा उघडीप दिली तर फवारणीसाठी मजूर मिळेना. त्यामुळे आता शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने फवारणी करण्याकडे वळत आहे. 

Drone Technology in Agriculture :

संतोष स्वामी : 

पारंपरिक शेती करताना येणाऱ्या अडचणी पाहता, दिंद्रुड येथील शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करत शेतीच्या आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी अंकुश ठोंबरे व बाळू कोल्हापुरे यांनी शेतात फवारणीसाठी ड्रोन खरेदी केले आहे. परिसरातील शेतकरी आता फवारणीसाठी ड्रोन तंत्राचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि पैसे दोन्हीची बचत होत आहे.पिकांतील तीन ते साडेतीन फूट वाढलेल्या दाट झाडीमध्ये असुरक्षितता जाणवते. पंपाद्वारे फवारणी करण्यासाठी मनुष्यबळही जास्त लागते. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाची पिके जोमात आहेत. शेतकरी खुरपणी आणि फवारणीच्या कामाला लागले आहेत. फवारणीसाठी मजूर लवकर मिळत नाहीत. तसेच त्यासाठी लागणारा खर्चही दोन हजार रुपयांच्या घरात जातो. वेळही जास्त लागतो. त्या तुलनेत ड्रोनद्वारे फवारणी केल्यास खर्च कमी आणि वेळेची बचत होते. त्यामुळे मजूरांना पर्याय म्हणून शेतकरी ड्रोनद्वारे फवारणी करण्याकडे वळत आहे. वेळेची बचत व मनुष्यबळ कमी लागत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. या भागातील ही फवारणी कशी होते? हे कुतुहलाने पाहण्यासाठी आलेले जवळपास ५० शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ड्रोनद्वारे फवारणीचा निर्णय घेतला आहे.

प्रयोग यशस्वी ड्रोन फवारणीचा प्रयोग यशस्वी होत असून कीटनाशक, बुरशीनाशक व टॉनिकची फवारणी करणे सोपे झाले आहे. तसेच शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचण्यास मदत होत आहे. बाळासाहेब ठोंबरे यांच्या तीन एकर सोयाबीन पिकावर फवारणीसाठी वीस मिनिटांचा वेळ लागला. 

सोयाबीनचा दाटवा व उंच झाडीमुळे फवारताना आम्हाला अनेक अडचणी येतात. ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे वेळ, औषधाची बचत व सुरक्षित फवारणीमुळे उत्पादनात वाढ होणार असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत.- हनुमंत काशीद, शेतकरी, दिंदुड

ड्रोनद्वारे फवारणी करताना एका वेळी १० लिटरची क्षमता असलेली टाकी ड्रोनला बसवलेली असते. १५० मिली कीटकनाशक, १०० मिली बुरशीनाशक व ५०० मिली डीएपी लिक्विडसह १० लिटर पाणी एका वेळी एक एकर फवारणीसाठी वापरात येते. याला मनुष्यबळाच्या तुलनेत खर्चही परवडणारा आहे. - मनोज ठोंबरे. शेतकरी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रण