Drone Technology :
बाबू खामकर :
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके बहरात आहेत; परंतु मागील पंधरा दिवसांत ढगाळ वातावरणाने खरिपातील पिकांवर वेगवेगळ्या कीड व रोगांनी चांगलाच हल्ला चढवला आहे. त्यामुळे पावसाची उघडीप होताच भूम तालुक्यातील शेतकरी पिकावर फवारणी करण्यात व्यस्त झाले आहेत. फवारणीसाठी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची साथ शेतकऱ्यांना मिळते आहे. शिवाय उत्पादन खर्चही याला जास्त लागत नाही.
दरम्यान त्यांना फवारणीसाठी आता नव्या तंत्राची जोड मिळाली आहे. आता फवारणी करण्यासाठी ड्रोनव्दारे अगदी सोप्या पध्दतीने फवारणी केली जाते. त्यामुळे आता शेतकरी वर्गाचा कल या नव्या तंत्रज्ञानाकडे वाढताना दिसत आहे.
भूम तालुक्यात यंदा पन्नास हजार हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला असून, यातील नव्वद टक्के क्षेत्रात सोयाबीनचे पीक डोलत आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे पिकांची वाढही समाधानकारक आहे.
त्यामुळे या हंगामातून चांगले उत्पादन मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती; परंतु सततचा पाऊस, ढगाळ हवामानामुळे पाथरूड परिसरात अनेक शेतकरी ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी या तंत्रज्ञानाकडे वळले आहेत. यावर्षी तालुक्यात सर्वत्र पिकांची वाढ जरी चांगली असली तरी त्यावर सध्या विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळत आहे.
तंत्रज्ञानाची जोड देऊन तालुक्यातील अनेक शेतकरी ड्रोनद्वारे खरीप पिकांवर फवारणी करताना दिसत आहेत. ड्रोनद्वारे फवारणीमुळे मजुरांचा ताण नाहीच, शिवाय वेळेचीही मोठी बचत होतो. वाढ जोमदार झाल्याने पिकांमध्ये जाता येत नाही. शिवाय, फवारणीसाठी मजूर देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर फवारणीसाठी अडचणी येत आहेत.
दिवसभरात १५ ते २० एकरांत होते फवारणी
ड्रोनद्वारे दिवसभरात जवळपास १५ ते २० एकर क्षेत्राची फवारणी होते. यामुळे वेळेची बचत होत आहे. ड्रोनद्वारे फवारणीसाठी शेतकऱ्यांना औषधाव्यतिरिक्त्त प्रति एकर ७०० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे खर्चाचाही फारसा भार वाढत नसल्याचे शेतकरी सांगतात.
सध्या वेटिंग सुरू
बहुतांश शेतकऱ्यांकडून फवारणीसाठी ड्रोनची मागणी होत आहे. आतापर्यंत जवळपास पाचशे एकर क्षेत्राची फवारणी करण्यात आली आहे. अजूनही चार-पाचशे एकर क्षेत्रात फवारणी करणे राहिले आहे. त्यामुळे सध्या वेटिंगवर शेतकऱ्यांना थांबावे लागत आहे.
- विनय गलांडे, ड्रोन ऑपरेटर
फवारणी करणे सहज शक्य
मागील पंधरा दिवसांमध्ये पिकांवर अळयांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे; परंतु पिकांची वाढ जास्त झाल्याने सोयाबीन पिकामध्ये फवारणीसाठी मजूर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत ड्रोनमुळे सहज फवारणी करता येते.
- माधव महानवर, शेतकरी, सावरगाव