पुणे : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनाचे अनुदान अद्याप मिळाले नसून या अनुदानाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. तर काही शेतकऱ्यांना वर्ष उलटून गेले तरी अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांकडून ठिबक सिंचनचे अनुदान कधी मिळणार अशी विचारणार होत आहे. तर या शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान मिळणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यामध्ये ठिबक आणि तुषार सिंचनाचाही सामावेश आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ८० टक्क्यापर्यंत तर बहूभूधारक शेतकऱ्यांसाठी ७५ टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येते. २० ऑक्टोबर २०२३ रोजी कृषी विभागाकडून ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती.
या यादीत नाव असलेल्या आणि त्याआधीच्या सोडतीत लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या ठिबकचे अनुदान अद्याप आले नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तर हे अनुदान जिल्हा पातळीवर वाटप करण्यात आले असून लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी लोकमत अॅग्रोशी बोलताना दिली.
'काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याने अनुदान मिळण्यास उशीर होत आहे. यावरही उपाय शोधून प्रत्येक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ पोहोचवण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्चअखेरपर्यंत अनुदानाची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.' असं ते म्हणाले.
आचारसंहितेतही अनुदान वाटप सुरू राहणारसध्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी शासकीय कामकाज सुरूच राहत असल्यामुळे जे अनुदान वाटप शेतकऱ्यांना सुरू आहे ते वाटप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत अनुदान मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
महा-डीबीटीद्वारे विविध योजनांचा लाभशेतकऱ्यांना महा-डीबीटीद्वारे विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करता येतो. तर त्यामध्ये ठिबक सिंचन, विहीर, तुषार सिंचन, सौरउर्जा पॅनेल, शेततळे, शेती औजारे, ट्रॅक्टर अशा विविध शेतीपयोगी वस्तूंचा सामावेश असतो. अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते.