शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत मिळण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने पीक पाहणीनुसार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यांच्यानुसार युद्धपातळीवर शेतकऱ्याचे आधारकार्ड, पासबुक, सातबारा जमा करण्याचे काम करण्यात आले.
मात्र, कागदपत्र जमा झाल्यावर शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळण्यासाठी केवायसी करणे केल्यामुळे शेतकरी वंचित राहिला आहे. सध्या शेतकरी बंधनकारक मदतीपासून केवायसी करण्यासाठी महाईसेवा केंद्रात हेलपाटे मारत आहेत.
मात्र सर्व्हर बंद असल्याने हताश होऊन रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागत आहे. गेल्या दहा दिवसांपासून केवायसी सर्व्हर बंद आहे. सर्व्हर चालत नाही. शेतकरी दिवस दिवस महा ई सेवा केंद्राच्या बाहेर बसून आता सर्व्हर चालू होईल मग सर्व्हर चालू होईल या आशेने आपला दिवस घालवत आहेत. मात्र सर्व्हर बंद मुळे शेतकरी दुष्काळी मदत निधीपासून वंचित राहिला आहे.
सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मतांसाठी मदत जाहीर केली आणि देण्याची वेळ आली की सर्व्हरची अडचण सांगून वेळकाढूपणा करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे सरकारला केवळ मतदान होईपर्यंत शेतकऱ्यांना झुलवत ठेवायचे आहे की काय असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
सरकारने मतदानाच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या निवडणूक प्रचाराचा धुराळा उडत आहे. अनेक प्रचार सभा होत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या या अडचणीवर कोणताच राजकीय नेता व पदाधिकारी बोलायला तयार नाही.
शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करणार
शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे. सर्व्हर बाबत टेक्निकल विभागाला कळवण्यात आले आहे. लवकरात लवकर केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.