राज्यात मराठवाड्यासह काही जिल्ह्यांत पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ४२ तालुके अवर्षणग्रस्त ठरविण्यात आले आहेत. यापैकी मोठ्या प्रमाणावर झळ बसलेले ४० तालुके अंतिम करण्यात आले असून या तालुक्यांत येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. यातील १४ तालुके मराठवाड्यातील आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा सुमारे १२ टक्के पाऊस कमी झाला आहे. केंद्र सरकारने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या शास्त्रीय निकषांच्या कसोटीवर ४२ तालुके पात्र ठरले आहेत. तत्पूर्वी, राज्यातील १९४ तालुक्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानुसार या तालुक्यांमध्ये दुसऱ्या ट्रिगरनुसार माहिती भरण्यात आली. त्यानुसार केवळ ४२ तालुके पात्र ठरले. मात्र, या तालुक्यांची पुन्हा नव्याने छाननी करण्यात आली असून, त्यातील दोन तालुके कमी होण्याची शक्यता असल्याचे, मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. बुधवारी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या स्वाक्षरीनंतर शासन आदेश काढण्यात येईल.
कोणत्या तालुक्यांचा समावेश?
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर, सोयगाव
जालना : जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा
बीड : वडवणी, धारूर, अंबाजोगाई
लातूर: रेणापूर; धाराशिव वाशी, धाराशिव, लोहारा
नंदुरबार : नंदुरबार
धुळे: शिदखेडा:
जळगाव : चाळीसगाव
बुलढाणा : बुलढाणा, लोणार
नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला
पुणे शिरुर, मुळशी, पौड, दौंड, पुरंदर, सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर
सोलापूर: करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला सातारा वाई, खंडाळा
कोल्हापूर: हातकणंगले, गडहिंग्लज
सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज