Join us

भीषण स्थिती असूनही अनेक तालुक्यांत दुष्काळ जाहीर नाही! शेतकऱ्यांमध्ये रोष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 5:25 PM

आमच्या तालुक्यांना दुष्काळाच्या यादीतून का वगळलं असा प्रश्न शेतकरी करत आहेत. 

सरकारने यंदा १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्ये २४ तालुक्यांत गंभीर स्वरूपाचा तरत १६ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. पण राज्यातील अनेक तालुक्यांत पावसाची भीषण स्थिती असूनही या तालुक्यांत सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नसून यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तर आमच्या तालुक्यांना दुष्काळाच्या यादीतून का वगळलं असा प्रश्न शेतकरी करत आहेत. 

दररम्यान, दुष्काळ लागू करण्यासाठी अनेक अटी आणि निकषांचा विचार केला जातो. त्यामध्ये जराही तूट आढळली तरी संबंधित तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला जातो. यामध्ये पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, मृदू आर्द्रता, वनस्पती निर्देशांक, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व निकषांचा विचार दुष्काळ जाहीर करताना केला जातो. दुष्काळासाठी लागू करण्यात आलेल्या निकषांच्या पहिल्या ट्रिगरमध्ये पावसाचा खंड, पावसाची सरासरी, पेरणीतील अडथळ्यांचा विचार करण्यात आला होता. 

पहिल्या ट्रीगरमध्ये १०४ तालुक्यांचा सामावेश होता. तर दुसऱ्या ट्रीगरमध्ये मातीतील आर्द्रता, भूजल पातळी, पिकांच्या स्थितीचा विचार करण्यात आला होता. यामध्ये ४२ तालुक्यांचा सामावेश होता. पण यामधून दोन तालुक्यांना वगळून ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. राज्यात अवर्षणग्रस्त तालुक्यांची किंवा मंडळांची संख्या जास्त असली तरी केंद्राच्या निकषामध्ये बसल्यामुळे अवघ्या ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झालाय.

दुष्काळाचे नियम काहीही असले तरी अनेक तालुक्यांत या निकषांपेक्षा बिकट परिस्थिती असलेले तालुके किंवा महसूल मंडळे आहेत. यामध्ये माण, खटाव, जत, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांचा समावेश आहे. तर आमच्या तालुक्यांचा रिपोर्ट चुकीचा दाखवला की यामागे काही राजकीय खेळी आहेत असाही प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

पुणे विभागातील वाई, खंडाळा, बारामती या तालुक्यांत पाऊस असूनही आणि पाण्याची उपलब्धता असूनही इथे दुष्काळ जाहीर केला पण पारंपारिक दुष्काळी असलेल्या जत, माण, खटाव तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला नाही. तात्पुरते निकष विचारात घेण्यापेक्षा तालुक्यातील एकूण परिस्थिती लक्षात घ्यायला हवी असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

सध्या नदीला पाणी नसल्यामुळे पेरण्यासुद्धा नीट झालेल्या नाहीत. ज्वारीची फक्त २५ ते ३० टक्के पेरणी झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांची ज्वारी एक फुटापर्यंत वाढली आहे. येणाऱ्या काळात जनावरांना पाणी नसणारे. विहिरी सुद्धा तळाला गेल्या आहेत. पण शासनाने आमचा तालुका कसा वगळला हेच कळत नाहीये. माण, माळशिरस, खटाव, फलटणचा निम्मा भाग यंदा दुष्काळी आहे.- बाळासाहेब माने  (शेतकरी - म्हसवड, माण)

पेरण्या झाल्या आहेत पण आत्ता पिकासाठी पाणी नाही. थोडंफार पाणी विहीरीमध्ये आहे पण पुरेशी लाईट नाही. सध्या विहीरीमध्ये असलेले पाणी फक्त महिनाभर पुरेल. दोन महिन्यात सगळं वाळून जाईल. उन्हाळ्यात पाणी प्यायला पुरणार नाही. त्यामुळे उन्हाळी पिकांचा तर विषयच नाही. - अजित थाडे गुरव (शेतकरी-म्हसवड, माण)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदुष्काळपाणी