हवामान खात्याच्या दृष्टीने पावसाळा ३० सप्टेंबर रोजी संपला असून चार महिन्यांत मराठवाड्यात ८५.५ टक्के पाऊस झाला आहे. अल निनोचा परिणाम मराठवाड्यातील पावसावर झाला आहे. आठपैकी दोन जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला तर उर्वरित सहा जिल्ह्यांत सामान्यतः सरासरीच्या आसपास पाऊस झाला असून विभागातील ७६ पैकी २८ तालुक्यांत ७५ टक्क्यांच्या आत पाऊस झाला आहे. परिणामी, या तालुक्यांवर दुष्काळी सावट आहे.
मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट ३० सप्टेंबरपर्यंत आहे. ६७९.५ मि.मी. विभागाची वार्षिक सरासरी आहे. त्यापैकी ५८१.५ मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी ११३ टक्के (७६९.७ मि.मी.) पाऊस झाला होता. परतीच्या पावसाचा काळ ४ ऑक्टोबरनंतर सुरू होणार, असे हवामान खात्याचे भाकीत आहे.
१२२ पैकी सरासरी ४० दिवसच पडला पाऊस
मराठवाड्यावर येणाऱ्या काळात दुष्काळाचे सावट आहे. जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत १२२ दिवसांत सरासरी ४० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला. ७ सप्टेंबरपासून पुनरागमन केलेल्या पावसाने विभागाला थोडाफार दिलासा मिळाला.
हे तालुके संकटात
छत्रपती संभाजीनगर, मंठा, घनसावंगी, बीड, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, वडवणी, लातूर, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, शिरूर- अनंतमाळ, जळकोट, धाराशिव, तुळजापूर, भूम, कळंब, वाशी, कंधार, परभणी, पाथरी, जिंतूर, पूर्णा, सोनपेठ, मानवत हे तालुके अजूनही दुष्काळाच्या संकटात आहेत.