- रविंद्र शिऊरकर
छत्रपती संभाजीनगर : गेल्या एक दोन आठवड्यापासून थंडीचे प्रमाण कमी झाले असून उष्णतेचा पारा वाढला आहे. यामुळे शेतात कणीस भरणी अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी, शेवटच्या एक दोन पाण्यावर आलेले गहू, कांदा, मका आदी पिकांना पाण्याची अधिक गरज भासत आहे.
यंदा वातावरणाच्या लहरी पणामुळे उशिराने खरीप हंगाम सुरू झाला. पुढे दिर्घ खंड देत पाऊस पडला. ज्यामुळे खरिपाचे जेमतेम पीक हातात आहे. पुढे काही भागात अवकाळी ने नुकसान देखील झाले. मात्र असे असतांना यातून सावरत शेतकरी पुन्हा उभा राहिला आणि रब्बी बाजरी, ज्वारी, मका, गहू, हरभरा, कांदा, करडई, असे विविध पिके त्याने उपलब्ध पाण्याचा अंदाज घेत केली. सध्या हि पिके चांगली वाढलेली आहे मात्र पाण्याअभावी आता सुकत असून यातून उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात नोव्हेंम्बर च्या शेवटच्या हप्त्यात अवकाळी म्हणून बरसलेला पाऊस वरदान ठरला आणि त्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. ज्यामुळे रब्बी पिके उभी राहिली. रब्बी बागायती क्षेत्रात वाढ झाल्याने सर्वत्र पाणी उपसा सुरु झाले. ज्यामुळे जलसाठे आता कमी होत असून सोबत पाणी टंचाई निर्माण होत आहे.
पाण्याअभावी पिके चांगली असून देखील उत्पन्न कमी
ज्वारी सध्या अंतिम कणीस भरणी च्या अवस्थेत आहे. या काळात पाणी अवश्य असते त्यामुळे दाणा पूर्णपणे फुगतो. तसेच गहू, कांदा पिकाला देखील उन्हामुळे कमी दिवसांत पाणी द्यावे लागत आहे. मात्र विहरीतील जल साठा कमी असल्याने अवघा एक ते दोन तास पंप चालतो त्यामुळे आता चांगले आलेले पीक उत्पन्न कमीचं देऊन जाणार अशी खंत वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी भास्कर पगार यांनी व्यक्त केली.