Join us

दुष्काळाचे सावट : मराठवाड्यातील धरणांत फक्त ४२ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 1:15 PM

...तर धरणांतील पाणी वापरावर निर्बंध: खरिपाची पिके येणार धोक्यात

अर्धा पावसाळा झाला तरी वरुणराजाने मराठवाड्याकडे पाठ फिरवलेली आहे. परिणामी, लहान-मोठी धरणे तळ गाठू लागली आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस न पडल्यास धरणातीलपाणी वापराविषयी निर्बंध येतील.

पावसाअभावी खरिपाची पिके धोक्यात येतील आणि पाण्याअभावी शेतकऱ्यांना रबी हंगाम घेता येणार नाही, अशी भीती जलतज्ज्ञांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील दीड कोटी जनतेची तहान ७०० धरणांवर अवलंबून आहे.

नांदेड वगळता उर्वरित सातही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत जोरदार पाऊस पडला नाही. जायकवाडीतही केवळ ३३ टक्के जलसाठा आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी निम्न दुधनात २७ टक्के, येलदरीत ५९, सिद्धेश्वर ४४. माजलगाव १५, मांजरामध्ये २६, पेनगंगात ६३, मानार ५१ टक्के, निम्म तेरणात २७, विष्णूपुरीत ७९ तर सीना कोळेगावमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. या सर्व धरणांतील एकूण सरासरी साठा ४२ टक्के आहे. मागील वर्षी ८२ टक्के होता.

मध्यम प्रकल्पांची भीषण स्थिती आहे. आगामी पावणेदोन महिने पावसाचे आहेत. या कालावधीत मुसळधार पाऊस होणे अपेक्षित आहे. जलतज्ज्ञांच्या मते दोन महिन्यांत पाऊस न पडल्यास समन्यायी पाणीवाटप ऑक्टोबरपर्यंत उर्ध्व धरणातून जायकवाडीत पाणी सोडावे लागेल. मात्र तिकडचीच धरणे न भरल्यास वाद पेटू शकतात. अशी स्थिती २०१५-१६ मध्ये होती.

काय म्हणतात जलतज्ज्ञ?

७ हजार गावांची तहान धरणांवर अवलंबून

आजच्यासारखी परिस्थिती पुढे दोन महिने राहिल्यास धरणातील उपलब्ध पाण्यावर आरक्षण राहील. केवळ पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले जाईल. कडक ऊन असल्यास बाष्पीभवनाचे प्रमाण वाढेल. एकट्या जायकवाडीवर जालना, छत्रपती संभाजीनगरसह ३०० गावे अवलंबून आहेत. अन्य मोठ्या आणि मध्यम प्रकल्पावर सुमारे ७ हजार गावांची तहान भागविली जाते. गतवर्षी सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस पडला. यामुळे यंदाही लागेल. पडेल, अशी अपेक्षा ठेवूया. -डॉ. शंकर नागरे, जलतज्ज्ञ

मराठवाड्यात ११ मोठे आणि ४८ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात आज जेमतेम पाणीसाठा आहे. पावसाअभावी कोरडवाहू पिके सुकू लागली आहेत. तातडीने मुसळधार पाऊस पडणे गरजेचे आहे. समन्यायी पाणी ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीत वाटप कायद्यानुसार १५ ६५ टक्के पाणीसाठा आणण्यासाठी ऊर्ध्व भागांतील धरणातून पाणी सोडावे - महेश निनाळे, इंजिनिअर, जलतज्ज्ञ

रबीही घेता येणार नाही

मराठवाड्यातील सुमारे ५५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४५ लाख हेक्टर पेरणीयोग्य आहेत. यातील ७५ टक्के क्षेत्रावर खरिपाचीच पेरणी होते. केवळ २० ते २५ टक्के क्षेत्रावरच रबी हंगामात पेरणी होते. पुरेसा पाऊस न पडल्यास या पाण्याच्या वापरावर निर्बंध येऊन पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येईल. परिणामी, रबीसाठी धरणातून पाणी मिळणार नाही.

मराठवाड्यातील प्रमुख धरणांचा जलसाठा 

धरण  जलसाठा 
जायकवाडी ३३.१८%
माजलगाव१५.८७%
मांजरा २६.८५%
विष्णुपुरी७९.११%

 

टॅग्स :धरणमराठवाडा वॉटर ग्रीडपाणीपाणी टंचाईपाणीकपातमराठवाडाखरीपमोसमी पाऊसपाऊस