Join us

Dr.Pdkv : शिवारफेरी शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाची पंढरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 16:41 IST

अकोला कृषी विद्यापीठात तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल, अशी साधनांची माहिती दिली. (Dr.Pdkv)

Dr.Pdkv :

अकोला : 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीचा रविवारी (२२ सप्टेंबर) रोजी थाटात समारोप करण्यात आला. या तीन दिवसांत हजारो शेतकऱ्यांनी या कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नवे वाण, कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्ञान व संशोधन केवळ चार भिंतीत न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी शिवार फेरीसारखा उपक्रम स्तुत्य आहे. अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवावी. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन नवसंशोधनाला चालना द्यावी आणि शेतकऱ्याला परवडेल असे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले.  शिवार फेरी व चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात पालकमंत्री विखे पाटील यांनी सुरुवातीला शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. या वेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, कार्यकारी समितीचे सदस्य विठ्ठल सरप पाटील, हेमलता अंधारे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाने नवसंशोधनाला चालना द्यावी

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याचे जीवनात परिवर्तन करण्यासाठी त्याला परवडेल असे तंत्रज्ञान, साधने मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाने नवसंशोधनाला चालना द्यावी. कृषी विज्ञान केंद्रे ही संशोधनाची रोल मॉडेल व्हावीत. शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा व्यापकपणे वापर करावा.

■ पॉलीहाऊससारखे तंत्रज्ञान गरजूंपर्यंत पोहोचले पाहिजे, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले, आमदार सावरकर यांनी शेती विषयावर विचार मांडले कुलगुरू डॉ. गडाख यांनी शिवार फेरी व विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेती