Join us

मराठवाड्यात हवामान कोरडे, रब्बी पिकांना, फळबागांना कसे जपाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 4:00 PM

रब्बी पिकांसह फळबाग, भाजीपाल्याचे करा असे करा संरक्षण, कृषी विद्यापीठाने दिलाय कृषीसल्ला

मराठवाड्यात पुढील सात दिवस तापमान कोरडे राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.  १ व २ फेब्रुवारी रोजी किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कोरड्या हवामानात पिकाची कशी काळजी घ्यावी यासाठी कृषी हवामान सल्ला दिला आहे.

रब्बी ज्वारीची घ्या अशी काळजी

  • मागील पाच दिवसात किमान तापमानात  झालेल्या घटीमुळे उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. 
  • दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात.  

किकुलॉजी: थंडीत पिकांना बसतोय ‘कोल्ड शॉक’, काय होऊ शकतात परिणाम?

गव्हाची कशी घ्याल काळजी?

  • गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे.
  • गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.  

पीएच अर्थात सामूचा पिकांच्या वाढीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या समस्या आणि उपाय

उन्हाळी भुईमूग पिकात पेरणीपूर्वी करा बीजप्रक्रीया..

i. थायरम 3 ग्रॅम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा  5 ग्रॅम प्रति किलो बियाणे. 

ii. प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम व पी.एस.बी. प्रतयेकी 250 ग्राम किंवा द्रव स्वरूपात असेल तर प्रत्येकी 60 मिली.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

  • मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.  
  • केळी बागेत पोटॅशियम 50 ग्रॅम प्रति झाड खतमात्रा द्यावी. द्राक्ष बागेत फळांचा आकार वाढण्यासाठी द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड 200 मिली ग्रॅम प्रति 10 लिटर द्रावणात बूडवावे.
टॅग्स :हवामानरब्बीतापमानगहूज्वारी