Lokmat Agro >शेतशिवार > कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव

कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव

Dry wells and water in the eyes.. The reality of Marathwada village suburbs | कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव

कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव

पावसानं मागचे काही आठवडे ताण दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत ॲग्रो’ ने थेट शेत-शिवारात जाऊन मांडलेलं मराठवाड्यातील प्रातिनिधिक वास्तव.

पावसानं मागचे काही आठवडे ताण दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत ॲग्रो’ ने थेट शेत-शिवारात जाऊन मांडलेलं मराठवाड्यातील प्रातिनिधिक वास्तव.

शेअर :

Join us
Join usNext

सकाळी १० ची वेळ. मराठवाड्यातील चटका बसणारे ऊन. आभाळ पांढरेच. छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे ७३ किमीवर असणाऱ्या वैजापूर तालुक्यात शेवटचा पाऊस येऊन दीड महिना उलटलेला. राज्यात ‘दुष्काळ जाहीर करा’ ही मागणी जोर धरू लागली असताना या भागात कोण्या नवख्या माणसाने पाऊल ठेवले तर शेतातील हिरवळ पाहून “सगळे तर हिरवे दिसते आहे, कुठे आहे दुष्काळ!’ असे वाटावे. मात्र, वाढ थांबलेल्या  कपाशी, मका, भुईमुग पिकांनी जवळपास माना टाकल्याचे चित्र जसजसे छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊ तसे अधिक गंभीर होत जाणारे...

वैजापूर तालुक्यातील वळण गाव. तालुक्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर. जमीन तशी भुसभुशीत. भुईमुग, कपाशी, मका ही मुख्य खरीपातील पिकं. हरीण, काळविटांचा वावर वाढल्याने आता भुईमुग घेणं बहुतांश शेतकऱ्यांनी कमी केलं आहे. परिणामी, मका, कपाशी लावण्याचं प्रमाण अधिक. “जमिनीतली सगळी पोषक तत्व ओढून घेतो मका. आता मका वारंवार घेतला जात असल्याने उत्पादनात घट झाली आहे.” असे कृषी विभागातील अधिकारी श्याम पाटील सांगत होते. 

यंदा पावसाने ओढ दिली आणि शेतीची सारी गणिते फसली. एरवी पावसाळ्यात २२- २३ क्विंटल मका काढणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मक्याचे पीक उपटून टाकण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद, कन्नड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील उन्हाचा चटका जाणवू लागला होता. ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू होती. धुळीचे लोट अंगावर घेत तर कधी खड्डे चुकवत आपापल्या कामाला जाणे लोकांना सवयीचे झाले होते.

 “ आता पाऊस आला तरी काही उपयोग नाही. पिकाची वाढ खुंटली आहे. मका काही राहत नाही. उपटावाच लागंल.” वळण गावातील शेतकरी अभिषेक चव्हाण उदासपणे सांगत होते. मका आता गेल्यातच जमा आहे. भुईमुगाने माना टाकल्या आहेत. साडेतीन एकराचे एकूण शेत. त्यात दीड एकरात कापूस, एक एकरात मका आणि उर्वरित भागात भुईमुग, तूर लावल्याचे ते सांगतात. अभिषेक चव्हाण यांच्या शेतातील विहीर कोरडी झाली आहे. आता पीक उपटून टाकायची वेळ आल्याचे ते म्हणाले.

वैजापूर तालुक्यातील वळण गावातील विहीर कोरडी पडली आहे.
वैजापूर तालुक्यातील वळण गावातील विहीर कोरडी पडली आहे.

खरिपात एरवी शेती कामांमध्ये व्यस्त असणाऱ्या शेतकऱ्याच्या हाताला सध्या काही कामच शिल्लक राहिले नाही. गावातील विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. शेततळी आटली आहेत. पावसाच्या शक्यतांचे अंदाज विरले आहेत. करपलेल्या पिकातून जेवढं मिळतंय तेवढं तरी पदरात पडावे यासाठी एखादी बाई शेतात मुगाच्या शेंगा तोडताना दिसते तेवढेच. बहुतांश शेतकऱ्यांनी जमीन खरडून उरलं सुरलं पीक जनावराला चारा म्हणून देण्यास सुरुवात केली आहे. 

अजून पंधरा दिवस पाऊस झाला नाही तर जनावरांनाही पाणी राहायचे नाही अशी अवस्था असल्याचे वळण गावातील शेतकरी सांगत होते. मैलोंमैल शेतावर कोणीही दिसत नाही. घरासमोर गुरे बांधलेली दिसत आहेत. ट्रक्टर, दुचाक्या दारासमोर उभ्या आहेत. बैलगाड्यांची चाके थांबली आहेत. आता पावसावर सारी भिस्त आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण ठप्प झाले आहे. 

“धोंड्याचा महिना गेला पण पाऊस आला नाही. पाऊस आला असता तर जरा तरी भुईमुग मिळालं असतं. आता जेवढा मिळंल तेवढं विकून द्यायचं.” सुनिता ढाकणे सांगत होत्या. “दोन गुंठा जमिनीत भुईमुगाचे पीक घेतले. महिनाभर पाऊसच आला नाही. भुईमुग पिवळा पडला. पीक करपून गेले.”  सुनिता ढाकणे या महिला शेतकरी सांगताना कळवळत होत्या.

दुपारी साधारण १.३० च्या सुमारास सुनिता ढाकणे मुगाच्या शेंगा तोडताना..
दुपारी साधारण १.३० च्या सुमारास सुनिता ढाकणे मुगाच्या शेंगा तोडताना..

वैजापूर तालुक्यापासून सुमारे साडेचौतीस किमीवर असणारं गारज गावही याच संकटातून जात आहे. पावसाभावी पिके करपून गेली आहेत. जी पिके आहेत ती वाढतील असे वाटत नाही. जनावराला चारा देण्यासाठी ही पिके द्यावी लागत आहे. चारा नेण्यासाठी टेम्पो येतो रोज.. एकरी साधारण १० ते १५ हजार रुपये मिळतात. असे गारज गावचे शेतकरी सांगत होते. 

“मोसंबी गळून गेली बघा.. यंदा २ एकरावर ४०० झाडं लावली होती. ३० टन मोसंबी झाली. त्यातली ५ टन मोसंबी विकली. १७ हजार प्रती टनाने झाली विक्री. चांगला पाऊस झाला असता तर २५ हजार प्रती टनाने गेली असती.” 

काहींच्या जमिनी उतारावरच्या. “पाणी ठरत नाही जमिनीत” अशी नेहमीची तक्रार असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पाऊसच नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. दोन वासरं, २ बैल अशी जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर  पाण्याअभावी पुढचे १५ दिवस कसे काढायचे असा प्रश्न आहे. 
कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात  एकूण ९३.९३ टक्के पेरणी झाली. जिल्ह्यात एकूण ४८ लाख ६१ हजार ४४१ जनावरे असून लहान जनावरास प्रतिदिन ३ किलो तर मोठ्या जनावराला प्रतिदिन ६ किलो चारा लागतो. सरकारी आकड्यानुसार सप्टेंबर महिन्यात पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. मात्र, गावागावांमध्ये आतापासूनच चाऱ्याची कमतरता भासत असून येणाऱ्या काळात जनावरे जगवायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. 

शेत शिवारांमध्ये ही परिस्थिती असताना बाजारपेठा मात्र सुन्या सुन्या आहेत. एरवी बैलपोळ्याचा उत्साह बाजारपेठेत दिसत नाहीत. ‘‘पेरण्या झाल्यानंतर पुन्हा खतांची गरज लागंल म्हणून आम्ही खतं आणून ठेवलीत, पण उठावच नाहीत बघा कशाला,’’ एक कृषी केंद्र चालक सांगत होते. कृषी सेवा केंद्रांसह इतरही दुकानांमधली खरेदी आता आटत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अवलंबून असलेल्या बाजारपेठांमध्येही आता काळजी आणि अस्वस्थता जाणवू लागली आहे.

आता दुष्काळझळा चांगल्याच बसू लागल्या आहेत. गावोगावी टँकरची वर्दळ वाढू लागली आहे. पाणी टंचाईचे सावट दिवसेंदिवस गडद होत असताना महिन्याचा खर्च भागवायचा कसा असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. आधीच कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता सावकार आणखी कर्ज देण्यास तयार होईनासे झाले आहेत. उत्पादनच नसेल तर कर्जाचा परतावा कसा करणार हा त्यांचा सवाल. पिकासाठी बँकेतून कर्ज घेतल्याने तोही मार्ग बंद होताना दिसतो आहे. कोरड्या पडलेल्या विहिरी पावसासाठी तहानलेल्या आहेत. येऊ घातलेल्या दुष्काळभयाने शेतकरी हतबल झाला आहे. परतीच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याला आता रब्बीची काळजी आहे, तोपर्यंत परतीचा पाऊस पडला तर ठिकच आहे...

Web Title: Dry wells and water in the eyes.. The reality of Marathwada village suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.