मेहरून नाकाडे
रत्नागिरी : गेल्या दोन दिवसापासून हवामानात बदल झाला असून हवेत गारवा आला आहे. रात्री थंडी पडू लागली असून धुकेही मोठ्या प्रमाणावर पडत आहे. आॅक्टोबर हीट यावर्षी चांगलीच राहिल्याने थंडीमुळे आंबा कलमाच्या मूळावर ताण येवून मोहोर सुरू झाला आहे. काही झाडांना मोठ्या प्रमाणावर पालवी आली आहे.
यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यातच आॅक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका सर्वाधिक होता. त्यामुळे हवेत गारठा सुरू होताच मोहोर प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कीडरोगाचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी काही बागायतदारांनी कीटकनाशकांची फवारणीही सुरू केली आहे.
काही झाडांना मात्र मोठ्या प्रमाणावर पालवी आहे. पालवी जून होण्यास दीड दोन महिन्याचा अवधी लागतो. त्यानंतर या झाडांना मोहोर प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते. गतवर्षी आॅक्टोबर पर्यंत पावसाळा असल्याने मोहोर प्रक्रिया विलंबाने झाली. तुलनेने गतवर्षी सर्वात कमी उत्पादन लाभल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी मात्र आॅक्टोबरच्या शेवटी का होईना मोहोर सुरू झाल्याने बागायदारांमध्ये उत्साह आला आहे. थंडी वाढली तर मोहोर चांगला होऊन बाजारात आंबा फेब्रुवारी, मार्चमध्ये दाखल होईल असे सांगण्यात येत आहे.