Join us

तणनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनी होऊ लागल्या खारपड, चोपन; मातीचा पोतही ढासळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 11:26 AM

शेती व्यवसायात मजुरांची समस्या व पशुधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी झाली. परिणामी रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपिकता व तिचा पोत ढासळत आहे.

बीड जिल्ह्यातील पिंपळनेरसह परिसरात शेती व्यवसायात मजुरांची समस्या व पशुधनाची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेणखताची उपलब्धता कमी झाली. परिणामी रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपिकता व तिचा पोत ढासळत आहे.

जमिनी खारपड व चोपन होत आहेत. उत्पादन खर्च वाढून पिकांचे उत्पादन कमी होत आहे. एकीकडे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत असताना दुसरीकडे वर्षाकाठी हजारो लिटर तणनाशकांचा वापर होत आहे.

यामुळे तणांचा बंदोबस्त होत असला तरी सततच्या अतिफवारण्यांमुळे जमिनीत पिकांना पोषक असणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंचा नाश पावत आहेत. पाण्याचे स्रोतही दूषित होत आहेत. पूर्वी पिकांमधील तण काढण्यासाठी खुरपणी, कोळपणी हे उपाय केले जात; परंतु कालांतराने शेतीत विविध तंत्र व यंत्राचा वापर होऊ लागला. यावर्षी पेरणीपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने पेरण्या वेळेवर झाल्या. पिकांची उगवणही चांगली झाली आहे.

औषधांचा खर्च टाळा, यंत्राचा वापर करा !

उगवणपूर्व व उगवणीनंतरच्या तणनाशकांची जादा मात्रा झाल्यास कोवळ्ळ्या पिकांना इजा होऊन पिके वाया जाण्याचा धोका असल्याने पिकांसाठी योग्य असलेल्या तणनाशकांचा वापर करून कोळपणीनंतर आवाढव्य होणारा औषधांचा खर्च टाळून तसेच यंत्राचा अधिक वापर करून तणांचा बंदोबस्त करावा, असा सल्ला तालुका कृषी विभागाचे गंडे यांनी दिला आहे.

वाढीसाठी पीक तणमुक्त ठेवा

• पिकांमध्ये गाजर गवत, तांदुळजा, कुंजरू, दुधी, हजारदाणी, करडू, चिकटा यांसारखी रुंद पानांची, तर हाराळी, कुंदा, शिप्पी, लेना, केना, लव्हाळा अशी एकदलवर्गीय तणे मोठ्या प्रमाणात आढळतात.

• या तणनाशकांचा प्रसार हवा, पाणी व पक्ष्यांच्या माध्यमातून होत आहे; परंतु हराळी, नागरमोथा, कुंदा या तणांचा बंदोबस्त होत नाही. पीकवाढीच्या सुरुवातीलाच पिके तणमुक्त ठेवणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते म्हणून सध्या तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे; परंतु त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत.

हेही वाचा - आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनशेती क्षेत्र