विनायक चाकुरे
शेतातील उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आणि बी-बियाणे, खते, कीटकनाशकांच्या किमतीत दरवर्षी वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडत आहे. सरकारी धोरणाचा फटका शेतकऱ्याला बसत असून, शेती करणे कठीण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे.
उद्गीर तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. कधी अधिक पाऊस झाल्यास अथवा दुष्काळ पडल्यास त्याचा फटका शेतीस बसतो. दोन-तीन वर्षांनंतर अशी परिस्थिती उद्भवत असते. ओला अथवा कोरडा दुष्काळ या भागातील शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. कधी उत्पादन चांगल्याप्रकारे होऊनही शेतीमालाला भाव मिळत नाही, तर कधी शेतात पिकतच नाही. त्यातच सरकारच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
पारंपरिक पीक घेताना आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडींचा परिणाम देशांतर्गतच्या बाजारावर होतो. शेतीसाठी शेतकऱ्यांना बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खुल्या बाजारातून खरेदी करावे लागतात. काही वर्षांत बियाणे व खतांच्या तसेच कीटकनाशकांच्या किमतीत तिप्पट-चौपट वाढ झाली आहेत. परंतु, शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला मात्र सध्या बाजारात मिळणारा दर हा मागील सात-आठ वर्षांपूर्वीप्रमाणे आहे. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे.
लागवड, मशागतीचा खर्चही निघेना...
बी-बियाणे, रासायनिक खते व लागवडीचा खर्च पाहता शेती स्वतः करण्याऐवजी तोडून देण्याची वेळ आली आहे, शासन अनुदान देते. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिल्यास शेतकऱ्यांना कुणापुढेही हात पसरण्याची वेळ येणार नाही. महागडी बियाणे, खते वापरुनही शेतमालास चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे, असे राम काळोजी यांनी सांगितले.
नगदी पीक असलेल्या सोयाबीनला भाव नाही...
शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहतात, त्यावरच अर्थचक्र अवलंबून असते. परंतु गेल्या वर्षीपासून सोयाबीनला भाव मिळत नाही. पाच वर्षांपूर्वी सोयाबीनला ३ हजार ८०० रुपये प्रतिक्चिटल होता. आता ४ हजार ६०० रुपये आहे. दरम्यान, यंदा तुरीला उच्चांकी दर मिळत आहे. परंतु, गत पावसाळ्यात पावसाने मोठा ताण दिल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या हातात तुरीचे उत्पादन हाती पडले नाही.
यंदा सोयाबीनची नोंदणी नाही.
काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. खताच्या उपलब्धतेनुसार बाजारात खताचा पुरवठा करण्यात येतो. यंदा खताचा पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे, परंतु, सोयाबीन बियाणांसाठी पूर्व नोंदणी झालेली नाही. त्यामुळे कदाचित सोयाबीनच्या बियाणांची टंचाई होण्याची शक्यता आहे. - संदीप देशमुख, खत-बियाणे विक्रेते
सोयाबीनला हमीभावही मिळत नाही...
शेतीची नांगरणी, पेरणी व मशागतीचा खर्च त्यानंतर बी-बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरीचा खर्च एकत्रित केल्यास सोयाबीनला किमान ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला पाहिजे. परंतु, बाजारात मिळणारा सध्याचा दर पाहिल्यास शेती तोट्यात आहे.- शिवाजी बिरादार, शेतकरी