Join us

पावसाअभावी क्षेत्र घटले, बाजरीचे भाव वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 2:00 PM

हिवाळ्यात बाजरीची भाकरी महागणार !

पावसाअभावी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. राजस्थानातून येणारी बाजरी थोडी काळपट आहे. यामुळे चांगल्या बाजरीला भाव चढणार आहे. हिवाळ्यात गरम बाजरीची भाकरी खाण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. जर राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातून बाजरीची आवक झाली तर भाव स्थिर राहतील, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

बाजरी सध्या ३२ रुपये किलो

सध्या बाजारात राजस्थानची जुनी बाजरी विक्रीला येत आहे. 30 ते ३२ रुपये किलोने विकत आहे, तर काळपट बाजरी २६ ते २८ रुपयांपर्यंत विकली जात आहे.

भाकरी ४० रुपयांपर्यंत

सध्या रेस्टॉरंटमध्ये २० ते ४० रुपयांना एक नग बाजरीची भाकरी मिळत आहे. विशेषत: हॉटेल, ढाब्यावर बाजरीच्या भाकरीला जास्त मागणी असते.

जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र किती ?

जिल्ह्यात बाजरीचे एकूण क्षेत्र ३९९०४ हेक्टर आहे. त्यात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र १५३६८ हेक्टर एवढे आहे. म्हणजे यंदा ४८ टक्कांनी पेरणी क्षेत्र कमी झाले आहे.

या जिल्ह्यातून होते आवक

छत्रपती संभाजीनगरात आसपासच्या जिल्ह्यातून, तसेच राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातूनही बाजरीची आवक होत असते.

नवीन बाजरीत भाववाढ होईल नवीन बाजरीची आवक नोव्हेंबरच्या अखेरीस सुरु होईल. यंदा पेरणी क्षेत्र घटले आहे. यामुळे बाजरीच्या भावात किलोमागे ३ रुपये भाव वाढतील. सध्या ३२ विक्री होणारी बाजरी येत्या दोन महिन्यांत ३५ रुपये किलोपर्यंत विकली जाईल. -स्वप्नील मुगदिया, व्यापारी

भाव स्थिर राहतील

यंदा राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशात बाजरीचे पीक समाधानकारक आहे. या राज्यातून मोठ्या संख्येने नवीन बाजरी बाजारात आली तर भाव स्थिर राहतील.-प्रशांत खटोड, व्यापारी

टॅग्स :पीकशेती क्षेत्रशेतकरीऔरंगाबाद