यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. पावसाच्या पाण्यावर उसाचे पीक चांगले येते. तर उत्पन्नातही वाढ होते. मात्र, वेळेत पाऊस पडला नसल्याने जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे. यामुळे यंदा ऊस चारा म्हणून जनावरांच्या गोठ्यात अथवा गुऱ्हाळाच्या कढईतच अधिक प्रमाणात दिसून येणार असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. तसेच पाण्याअभावी ऊसाच्या उत्पन्नातही मोठी घट होणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे.
माळशिरस तालुक्याला नीरा नदी, नीरा उजवा कालवा, उजनी धरणाचे कालवे वरदान ठरले आहेत. यामुळे तालुक्यातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. यामुळे माळशिरस तालुका 'सुजलाम सुफलाम' झाला. या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक ऊस आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला ऊसाच्या लागणी होतात आणि त्याच काळात पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदाच्या वर्षी पावसाने दडी मारली असून, पावसाचे साडेतीन महिने उलटले तरीही चांगला पाऊस झाला नाही. धरणांचा पाणीसाठाही कमी असून, ऐन पावसाळ्यात नद्या कोरड्याठाक दिसू लागल्या आहेत. पाऊस नसल्याने नद्यांना पाणी नाही. यामुळे यंदाच्या वर्षी शेतीच्या पाण्याचा प्रश्न शेतकरी, बळीराजापुढे उभा राहिला आहे.
कारखान्यांपुढे अडचणी..
- पाण्याच्या कमतरतेमुळे उसाचे उत्पन्न घटणार आहे. पाण्याअभावी शेतकरी लवकरच ऊस गुन्हाळांना देतील. नाहीतर जनावरांना चारा म्हणून जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी उसासाठी कारखान्यांपुढे पुरवठ्याअभावी अडचणी निर्माण होणार आहे.
- माळशिरस तालुक्यात पाच साखर कारखाने आहेत. तसेच या तालुक्यातील ऊस हा इंदापूर, बारामती, फलटण या भागांतील कारखान्यात गाळपासाठी नेला जातो. यावर्षी उसाचे उत्पन्न कमी होणार असून, बहुतांश उसाचे पीक हे जनावरांना चारा म्हणून वापरला जात असल्याने शिल्लक उसाची पळवापळवी होणार, हे नक्की.