गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळ कांदा काढणी जवळजवळ संपली आहे. सध्या कांद्याला असलेला भाव कमी असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांद्याच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे.
त्यातील काही प्रमाणात कांदा मार्केटमध्ये आणला जात असला तरी पूर्णपणे कांदा साठवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या ओतूर उपबाजार येथे १२ ते १६ रुपये भाव असल्याने अपेक्षित भाव नसल्याने तूर्तास कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
यंदा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. सुरुवातीपासूनच वातावरणात बदल झाल्याने कांद्याची म्हणावी अशी फुगवण झाली नाही. शेतकऱ्याला कांद्याचे चांगले उत्पादन मिळेल असे वाटले असताना कांद्याला मोठा फटका बसला असून ४० ते ५० टक्क्यांपर्यंत एकरी उत्पादन घटले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या भाव नसल्याने कांदा साठवणुकीवर भर देत आहेत.
सध्याच्या अल्प दरात कांदा विकण्यापेक्षा साठवण करण्यास शेतकरी अधिक पसंती देत आहेत. जुन्नर तालुक्यातील मांडवी नदी, पुष्पावती नदी परिसरातील अनेक गावांमध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
अधिक वाचा: Onion Storage; कांदा चाळीत साठवायचाय मग घ्या ह्या योजनेचा लाभ
यंदा झालेल्या अल्प पावसामुळे फेब्रुवारी महिन्यातच नदीपात्र कोरडे पडत असल्याने नदीकाठ परिसरातील विहिरीदेखील पाणी पातळी कमी होत आहे. पुढे धरण जरी असले तरी नद्यांनादेखील कमी पाणी आहे.
दरवर्षी सर्वसाधारण जुन्नर तालुक्यातील माळशेज शेतकरी शेकडो क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करीत होता; मात्र यंदा काही शेतकऱ्यांनी उत्पादनातील घट असल्याने सुरुवातीला १३ ते १५ रुपये भावात कांदा विकला.
वातावरण बदलामुळे घटलेल्या उत्पादनामुळे तसेच कांद्याला मिळत असलेल्या अल्प बाजारभावामुळे यंदा अनेक शेतकरी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर देत आहेत. साठवणूक करून दोन पैसे मिळतील, अशी रास्त अपेक्षा असल्याने शेतकरी कांद्याची साठवणूक करीत आहेत.
दोन पैसे मिळतीलयंदा काही शेतकऱ्यांनी उत्पादनातील घट असल्याने सुरुवातीला १३ ते १५ रुपये भावात कांदा विकला. वातावरण बदलामुळे घटलेल्या उत्पादनामुळे तसेच कांद्याला मिळत असलेल्या अल्प बाजारभावामुळे यंदा अनेक शेतकरी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर देत आहेत. साठवणूक करून दोन पैसे मिळतील, अशी रास्त अपेक्षा असल्याने शेतकरी कांद्याची साठवणूक करीत आहेत.
दिवसेंदिवस बाजारभावही कमी होत असल्याने पुढे तरी कांद्याला भाव मिळेल, या आशेने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत आहेत. पण राज्य व केंद्र शासन यांनी आता कांद्याच्या दरवाढीसाठी खरा विचार करण्याची गरज आहे. शेतकरी बाजारभाव नसल्याने मेटाकुटीस आला आहे. - प्रीतम डुंबरे, कांदा उत्पादक शेतकरी