राज्यात राज्यातील ४० तालुक्यांमध्ये काल दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर लन्यातील परतूर तालुक्यात अल्पशा पावसामुळे धरणासह विहिरी, बोअरची पाणीपातळी घटली आहे. त्यातच आता शेततळ्यांनी ही तळ गाठल्याने फळबागाचे क्षेत्र धोक्यात आले आहे.
मागील तीन ते चार वर्षापासून शेततळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अल्पशा पाण्यावर बागायती क्षेत्र जोपासण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेततळे तयार करीत आहेत. तीन ते चार वर्ष चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी शेततळ्यांचा उपयोग करीत नव्हते. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा या शेततळ्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहेत. पावसाळ्यात अत्यल्प झालेला पाऊस व परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ यामुळे पाणीपातळीत कुठेही वाढ झालेली नाही.
पावसाळ्यात शेतकऱ्यांनी भरून घेतलेल्या शेततळ्याचा वापर रब्बी हंगामापासून सुरू झालेला आहे. शक्यतो या शेततळ्यांचा वापर उन्हाळ्यात शेतकरी करतात. मात्र यावर्षी पाणी नसल्याने रब्बी हंगामातच शेतकऱ्यांनी शेततळ्यातील पाण्याचा वापर सुरू केला आहे.परिणामी, शेततळ्यांनी तळ गाठला आहे. एकूणच पुढील काळात पाणी नसल्याने तालुक्यातील फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
पाण्याअभावी रबी हंगामच धोक्यात
- तालुक्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरवली. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे.
- गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने निम्न दुधना प्रकल्पासह इतर लहान- मोठी धरणे भरली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके चांगलीच तराराली होती. यंदा मात्र, पाऊस नसल्याने रब्बी हंगामाच धोक्यात सापडला आहे.