Join us

मजूर मिळत नसल्याने इर्जिक पद्धतीने शेतात कोळपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 10:34 AM

करमाळा तालुक्यात यावर्षी खरिपासाठी उडीद व तूर पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून मजूर मिळत नसल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी शेतामध्ये कोळपणी करण्यात मग्न आहेत.

करमाळा तालुक्यात यावर्षी खरिपासाठी उडीद व तूर पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून मजूर मिळत नसल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी शेतामध्ये कोळपणी करण्यात मग्न आहेत. सर्वांची कोळपणीची कामे एकाच वेळेस आल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी एकमेकांच्या शेतात सायकल कोळप्याने कोळपणी कामासाठी जात आहेत.

करमाळा तालुक्यात यावर्षी आतापर्यंत २१,५१० हेक्टर क्षेत्रावर उडीद तर १२,७६७ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. याशिवाय मका, कांदा, मूग, हुलगा ही पिकेसुद्धा खरिपासाठी काही शेतकऱ्यांनी निवडलेली आहेत.

पोफळज, झरे, खडकेवाडी, वीट, कुंभेज, कोंढेज परिसरात सध्या तूर आणि उडीद पिकांची कोळपणी शेतकऱ्यांनी सुरू केली असून सध्या शेतकऱ्यांकडे सर्वत्र बैलांची संख्या कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या ट्रॅक्टरच्या साह्याने केल्या आहेत.

पेरण्या ट्रॅक्टरने शक्य असल्या तरी या पिकांमध्ये तण झाल्याने त्याची कोळपणी, खुरपणी करण्याची गरज आहे. ती ट्रॅक्टरच्या साह्याने करणे शक्य नसल्याने शेतकरी सर्वत्र हात कोळपे यांचा व सायकल कोळपे यांचा वापर करून या पिकांमधील तण काढण्याचे काम करत आहेत.

एकाच वेळेस सर्व शेतकऱ्यांची कोळपणी आल्याने मजुरांची टंचाई भासत असून शेतकरी कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या शेतामध्ये इर्जिक पद्धतीने कोळपणी करण्यासाठी जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

करमाळा तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पूर्व भागात शेतकऱ्यांनी खरिपासाठी उडीद व तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. कोळपणी बरोबरच जोमदार पिकासाठी तुरीबाबत शेतकऱ्यांनी ४५ व ६० दिवसांनी शेंडा खुडावा, तर उडीद पिकावरील खोड माशीकरिता थायमेथोक्सामची फवारणी करावी. - संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी करमाळा

समाधानकारक पावसामुळे यावर्षी खरिपासाठी उडीद व तुरीचे पीक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. उडीद पिकांची उगवण काही ठिकाणी कमी झाली आहे. सध्या खरिपाची सर्वच पिके एकाच वेळी कोळपणीसाठी आली आहेत. कोळपणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी इर्जिक पद्धतीने एकमेकांच्या शेतातील कामे करत आहेत. - सूर्यभान इंगोले, शेतकरी, कोंढेज, ता. करमाळा

टॅग्स :खरीपपेरणीपीकशेतीपाऊससोलापूरकरमाळा