केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस पुन्हा परवानगी दिल्याने उत्पादक कंपन्यांच्या समभागांत शनिवारी १२ टक्के वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारांचा लाभ झाला आहे. एका कंपनीच्या समभागास तर अपर सर्किटही लागले. ७ डिसेंबर रोजी सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस बंदी घातली होती.
इथेनॉल निर्मितीवरील बंदी मागे घेतल्यामुळे कंपन्यांच्या समभागांत मोठी खरेदी पाहायला मिळाली. यामुळे कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ झाली.
कंपनी | तेजी | सध्याची किंमत (रु.) |
धामपूर शुग मिल्स | १२.५% | २७९ |
बजाज हिंदुस्थान शुगर | १०% | ३०.७५ |
उत्तम शुगर मिल्स | १० % | ४४० |
रेणुका शुगर्स | ९% | ५०.९० |
मगध अँड एनर्जी | ९% | ७४४.८० |
बलरामपूर चिनी मिल्स | ७.७% | ४१४ |
डालमिया भारत शुगर | ७.५% | ४३० |
अवध शुगर अँड एनर्जी | ७% | ७३९ |
मवाना शुगर्स | ६% | १०२.१० |
साखरेच्या २०२३-२४ च्या गळीत हंगामात साखर कारखान्यांना इथेनॉल बनविण्यासाठी उसाचा रस आणि साखरेची म्हणजेच बी-हेवी प्रतीची मळी या दोन्हींचाही वापर करण्याची परवानगी केंद्र सरकारने शुक्रवारी पुन्हा दिली मात्र, त्यासाठी साखरेची मर्यादा १७ लाख टन निश्चित करण्यात आली आहे. त्यातून साखर उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळाला.
केंद्राकडून इथेनॉल निर्मितीवरील बंदी मागे; १७ लाख टन साखरेची मर्यादा
तेल कंपन्यांकडे झालेल्या करारानुसार यंदाच्या हंगामातील आतापर्यंत ३० लाख टन साखर आणि जानेवारीपर्यंतचे ५ लाख टनाचे संभाव्य करार विचारात घेता एकूण ३५ लाख टन साखरेपासून इथेनॉलचे उत्पादन होईल, असा अंदाज होता. त्यातील १७ लाख साखर इथेनॉलकडे वळवण्यास परवानगी दिली आहे. म्हणजे यंदाच्या हंगामातील जी साखर इथेनॉलकडे जाणार होती त्यातील अजूनही निम्मी साखर देशाच्या बाजारपेठेत येऊ शकते. त्याचा दरावर परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारला लोकसभा निवडणुकीपर्यंत साखरेचे दर वाढू द्यायचे नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.