Join us

मॉन्सून लांबल्याने राज्यात खरिपाच्या केवळ दीड टक्काच पेरण्या 

By नितीन चौधरी | Published: June 23, 2023 2:09 PM

पेरणीला आहे अजून अवधी, १० जुलैपर्यंतही करता येईल पेरणी, शास्त्रज्ञांचा सल्ला

पुणे : पावसाचे आगमन लांबल्याने राज्यभर पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र आता  पुढील एक दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करत आहेत.  गेल्या तीन वर्षांचा अपवाद वगळता राज्यात अनेकदा जूनच्या शेवटी पाऊस होऊन पेरण्यांना सुरुवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर न सोडता १० जुलैपर्यंत कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांची करावी, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी दिला आहे.

दरम्यान, कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत पावणे दोन लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सव्वा लाख हेक्टर क्षेत्र कापसाखालील आहे. ज्यांच्याकडे संरक्षित पाण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी बागायती कापसाची लागवड केलेली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २४ जून नंतर  राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.  राज्यात सरासरी १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी केली जाते. मात्र पावसाने ओढ दिल्याने पेरण्यांना सुरूवात झालेली नाही. काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत केवळ १ लाख ७४ हजार ५५६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. 

त्यात कापूस पिकाचे क्षेत्र सर्वाधिक १ लाख २६ हजार ९१६ हेक्टर इतके आहे. तर कापसानंतर सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकाची केवळ २२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर भात पिकाची ४३ हजार ११० हेक्टरवर एकूण अन्नधान्य पिकांची ४७ हजार ०४८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यास उडीद मूग या कडधान्यांची पेरणी जास्त होते. मात्र, या दोन्ही पिकांची अनुक्रमे २० व २२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पेरण्या लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. “गेल्या तीन वर्षांमध्ये अति पाऊस झाला होता. तसेच पावसाचे दिवसही जास्त होते. मात्र, त्यापूर्वीच्या काही वर्षांचा अभ्यास करता जूनच्या अखेरीसच चांगला पाऊस होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे यंदाही जूनच्या अखेरीच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात अर्थात १० जुलैपर्यंत कापूस, सोयाबीन या सारख्या पिकांची पेरणी करणे शक्य आहे. त्यानंतर पाऊस लांबल्यास मात्र, या पिकांच्या उत्पादनात घट येऊ शकते. मात्र, पाऊस येईल हे नक्की,” असा सल्लाही खर्चे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. उडीद मूग या पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला असून पाऊस आल्यानंतर कमी कालावधीच्या जातींची लागवड करावी. कापूस व सोयाबीन पिकाच्या लागवडीला अजून अवधी आहे.- डॉ. विलास खर्चे, संचालक, संशोधन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
एकूण१७४५५६
कापूस१२६९१६
सोयाबीन२२३
भात४३११०
मका११००

 

टॅग्स :शेतकरीपाऊसमहाराष्ट्र