विदर्भाच्या कॅलिफोर्नियात शेंदूरजनाघाट येथे संत्रा, मोसंबीसह लिंबूवर्गीय कलमांचे मोठे उत्पादन घेतले जातात. दरवर्षी एक ते दीड कोटी संत्रा कलमांची निर्मिती होते. मात्र, मृगाच्या पावसाने जून महिन्यात दडी मारल्याने संत्रा कलम उत्पादकाला फटका बसला, तर राजस्थानच्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने ५० टक्के संत्रा कलम विक्रीच्या प्रतीक्षेत असून, मागणी घटल्याने भावही वधारले आहे.
शेंदूरजनाघाट येथे १९४५ च्या काळापासून म्हणजेच ७५ वर्षांपासून संत्रा कलम निर्मितीचा पारंपरिक व्यवसाय आहे. येथून देशाच्या कानाकोपऱ्यात संत्रा-मोसंबी कलम नेऊन उत्पादन घेतले जाते.
शेंदूरजनाघाटसह तालुक्यात अधिकृत नर्सरी परवानाधारकांची संख्या २२० आहे, तर तेवढीच विनापरवानाधारकांची संख्या आहे. इडिलिंबूपासून काढलेल्या बियापासून नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये जंभेरींचे रोप तयार करून त्यावर संत्रा, मोसंबी, लिंबूची कलम (डोळा) चढविण्याची बडींग प्रक्रिया केली जाते.
१८ महिने मशागत जपवणूक करून जुलैच्या पहिल्या आठवड्यात संत्रा, मोसंबी, लिंबूची कलम विक्रीकरिता उपलब्ध होतात. येथे मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणासह पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी संत्रा- मोसंबीचे कलम खरेदीकरिता येतात. परंतु, यावर्षी मृगाच्या पावसाने राज्यात दडी मारल्याने जून महिन्यात पाऊस आलाच नाही, तर राजस्थान आणि मध्य प्रदेशातून येणाऱ्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.
शेकडो हातांना रोजगार देणारा संत्रा मोसंबी कलम
संत्रा-मोसंबी कलम विक्रीचे माहेरघर म्हणून शेंदूरजनाघाट तिवसा घाट बाजार विदर्भात एकमेव आहे. येथे कलम काढणे, बांधणे यासाठी शेकडो मजूर, दोरी, पोते विक्री करणारे दुकानदार, वाहतूकदार, उपहारगृह आणि पानटपरी दुकानदारांना रोजगार मिळतो. यामुळे संत्रा मोसंबी कलमांची बाजारपेठ हजारो हातांना रोजगार देणारी असली, तरी या कलम खरेदीदारांची संख्या रोडावल्याने अनेकांना आर्थिक फटका बसत आहे.
हेही वाचा - Sunflower Farming आपत्कालीन पीक म्हणून होतोय वापर; सर्वच हंगामात बहरणारे सूर्यफुल