कोल्हापूर : मुख्यमंत्री बांबू मिशनअंतर्गत राज्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून १ लाख हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी सात लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
परंतु, कोल्हापूर जिल्ह्यात लागवडीसाठी आवश्यक रोपेच उपलब्ध नसल्याने ही बांबू लागवड ठप्प झाली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेतून पर्यावरण रक्षण, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, रोजगार निर्मिती करण्याची संकल्पना अमलात आणण्यात येणार होती.
या महत्त्वाकांक्षी योजनेच्या घोषणेनंतर १८ सप्टेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक बांबू दिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसरा जागतिक कृषी पुरस्कार प्रदान केला.
पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र या कार्यासाठी मुख्यमंत्र्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.
प्रत्यक्ष बांबू लागवडीसाठी हजारो शेतकऱ्यांनी बांबू लागवड योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांशी संपर्क केला. पण या योजनेमध्ये बांबू लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणारी रोपे पुरवठा करण्याचे धोरण चुकीचे असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले.
'ती' अट ठरतेय योजनेला मारक
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या स्थानिक बांबू प्रजातीला मागणी आहे; त्या प्रजातींची रोपे स्थानिक रोपवाटिकेतून न घेता फक्त महाराष्ट्रातील दोन आणि तामिळनाडूतील एक अशा संस्थांकडून रोपे घेण्याची अट या योजनेला मारक ठरत आहे. तातडीने ही अट काढून टाकावी, अशी मागणी बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून होत आहे.