Join us

आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना करावी लागणार ऊसबिलासाठी मोठी प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 11:14 AM

साखर कारखान्याकडे चालू हंगामाचे बिल व थकीत 'एफआरपी'चे देणे थकले

इस्माईल जहागीरदार

टोकाई सहकारी साखर कारखान्याकडे चालू हंगामाचे बिल व थकीत 'एफआरपी'चे देणे थकले आहे. सदर देणे देण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार मशिनरी विक्रीच्या निविदाही जिल्हा प्रशासनाने काढल्या होत्या. परंतु रोकाई सहकारी कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी पूर्णा सहकारी साखर कारखान्याने तयारी केली, यासंदर्भात ३० मार्च रोजी विशेष सभा बोलाविली होती. परंतु आचारसंहितेमुळे सभा तूर्त स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे 'टोकाई'चा प्रश्न लांबणीवर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थकीत रकमेसाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना कर्जापाई डबघाईस आला आहे. संचालक मंडळांनी कारखाना वाचावा, यासाठी प्रयत्न केले. एका संचालकाने तर डबघाईस कारखाना असताना डिझेलसह इतर साहित्यांना चुना लावला आहे. सद्य:स्थितीत कारखाना बंद असून, कारखान्याचा वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे.

काही दिवसांपासून येथील मोटारी चोरीस जात असल्याचीही चर्चा समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी टोकाई सहकारी साखर कारखान्याचा काहीतरी निर्णय लागेल, अशी आशा सर्वांना होती. परंतु आशेवर पाणी फेरले गेले आहे.

एका एकरातील टरबूज पिकातून मिळाले पावणे दोन लाखांचे उत्पन्न

मशिनरी विक्रीतून शेतकऱ्यांच्या रकमा देण्यासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. टोकाई सहकारी साखर कारखान्याची मशिनरी विक्री गेली तर भविष्यात कारखाना उभारणे कठीण होणार आहे. त्यासाठी पूर्ण'ने मदतीसाठी 'टोकाई' भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी केली. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार केला व त्यावेळी बैठकही झाली.

३० मार्च रोजी टोकाई भाडेतत्त्वावर घेण्यासाठी 'पूर्णेने विशेष सभा बोलाविली होती. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सदर सभा तूर्त स्थगित करावी लागली. लोकसभा निवडणुकीनंतर 'टोकाई'चा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा आहे. तोपर्यंततरी टोकाई सहकारी कारखान्याचा प्रश्न लांबणीवर पडला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसबिल व 'एफआरपी' रकमेसाठी वाट पाहावी लागणार आहे.

ऊसाची गोडी झाली कमी 

उसाची लागवड केली तर त्या पैशातून घरखर्च भागतो, उसनवारी फिटण्यासाठी हातभार मिळतो, असे शेतकयांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी दरवर्षी उसाची लागवड करतात. अनेक वर्षांपासून इसापूर व औता येथील सिद्‌धेश्वर धरणांचे पाणी मिळते. तीन वर्षापासून कारखान्याला ऊस दिला तरी पैसे वेळेवर मिळत नाही.

पैसे मिळाले असते तर उसनवारी फिटली असती

उसाचे थकलेले पैसे मिळाले असते तर उसनवारी तरी फिटली असती. तसेच उन्हाळी हंगामात मिळालेले पैसे कामी आले असते. आजमितीस शेतकरी उसनवारी करू लागला आहे. - श्रीराम गंगाधर इंगोले, शेतकरी

शेतकऱ्यांच्या नशिबी उसनवारी करून पोट भरणे आहे. कधी व्यापाऱ्यांचे पैसे ठेवले जाते तर कधी किराणा दुकानदारांचे. आता दोन वर्षांपासून कारखाना पैसे ठेवून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. - दत्तराव दळवी, शेतकरी

'टोकाई' डबघाईत आणि अध्यक्षांचा पत्ताच नाही

संचालक मंडळाने 'टोकाई' वाचविण्यासाठी तातडीच्या तीन बैठका घेतल्या गेल्या. परंतु एकाही बैठकीस अध्यक्ष शिवाजीराव जाधव हजर राहिले नाहीत. ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी टोकार्ड'वर एक हाती सत्ता देऊनदेखील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांना कारखाना चालवता आला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकयांतून अध्यक्षांबद्दल रोष व्यक्त केला जात आहे.

अनामत रकमा; शेतकऱ्यांचाही विचार व्हावा

तत्कालीन अध्यक्ष शंकरराव खराटे यांच्या काळात १० ते १२ शेतकऱ्यांनी टोकाई सहकारी साखर कारखाना चालू व्हावा, यासाठी जयप्रकाश नारायण नागरी बँकेकडून कर्ज काढत 'टोकाई'ला अनामत रकमा दिल्या होत्या. आजमितीस त्या मुद्दल रकमेसह त्याचे व्याज १ कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. त्यामुळे 'त्या' शेतकऱ्यांच्या रकमेचाही विचार होणे गरजेचे आहे.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतीशेतकरीनिवडणूक