जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ऊस कारखान्यांमुळे परिसरात 'भरभराट झालेली आहे. या तालुक्यामध्ये सुमारे सहा कारखाने कार्यरत आहेत. यंदा उसाचा उतारा कमी असला तरी कापणीसाठी ऊसतोड कामगार मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत, 'जिल्ह्यात ऊस जोमात, शेतकरी कोमात' अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र घटले आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात येथे चार कारखाने आहेत. मात्र तोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतित आहेत.
कामगारांची टंचाई
• अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. यंदाच्या हंगामात सर्व कारखाने सुरू झाले आहेत.
• दरवर्षी बाहेरगावाहून येणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या ऊसतोडणीचे काम करतात.
• परंतु, यंदा कामगारांच्या टोळ्या कमी प्रमाणात आल्यामुळे ऊसतोडीसाठी मजूर मिळत नसल्याची स्थिती परिसरात आहे.
ऊस क्षेत्र घटले
१. यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र घटले आहे. जिल्ह्यात ४७ हजार २२७ हेक्टरवर उसाची लागवड आली आहे. जिल्ह्यात पाच साखर कारखान्यांना ऊस पुरवण्यात येतो.
२ कमी पावसामुळे उसाचा उतारादेखील अर्ध्यावर आला आहे. एकीकडे उसाचे क्षेत्र घटलेले असताना दुसरीकडे पीक तोडणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
ऊसतोडीला मजूर मिळेना
• अंबड आणि घनसावंगी येथील कारखाना परिसरातील उसाची तोडणी करण्यासाठी बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, हिंगोली येथून ऊसतोड कामगारांच्या टोच्या दरवर्षी दाखल होत असतात.
• यंदा मात्र, स्थिती बदलली आहे. परिसरात बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांतूनच टोळ्या दाखल झाल्या आहेत.
• स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होत असल्याने ऊसतोड मजुरांचे स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे.
• परिणामी परिसरात ऊसतोड कामगारांच्या शंभर टोळ्यादेखील उपलब्ध नसल्याने बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
दोन महिने उशिराने हंगाम
यंदाच्या वर्षी दोन महिने उशिराने ऊस गाळपाचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यातच ऊसतोड मजुरांचे प्रमाण कमी झालेले आहे. ज्या उसाची नॉव्हेंबर महिन्यात तोडणी होणे अपेक्षित होते, त्यांची तोडणी जानेवारी महिन्यात सुरू आहे. यामुळे एप्रिलपर्यंत संपूर्ण उसाची तोडणी होणे अवघड आहे. - सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी, संघटना