दिलीप कुंभार
नरवाड : नुकत्याच पार पडलेल्या दसरा सणामुळे पान उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. पान बाजारात पानांचे दर चढे राहिल्याने चांगल्या मोठवड पिवळ्या पानांना बाजारात मागणी वाढल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्याने दिलासा दिला.
वर्षातील अखेरचा बाजार म्हणून दसऱ्यातील नऊ दिवस या पान बाजारात तेजी कायम राहिली. ३०० पानांच्या एका कळी पानांच्या कवळीला किमान ५० ते १०० रुपये दर टिकून होता.
एका डप्प्यात (गठ्ठयात) किमान १० कवळ्या बसतात. एकंदरीत यामध्ये ३००० पाने बसविली पूर्वी ४० कवळीचा एक डाग जातात. असायचा. यामध्ये १२ हजार पाने बसविली जायची.
मात्र काळाच्या ओघात पानांचे डाग बंद होऊन किमान ३ हजाराचे डप्पे बांधण्यास सुरुवात झाली. याही पूर्वी पाने पान बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या करड्यांचा वापर होत होता.
मात्र करड्यांची उपलब्धता होत नसल्याने यात बदल होत गेला. तुतीच्या फोकांचे गोल रिंग कडे करून त्या कड्याला किमान चार पावट्या (तुंगुस) करून पाने बालाच्या (पानाभोवती विशिष्ट प्रकारचे किमान एक फुटाचा प्लॅस्टिक पट्टा) सहाय्याने पाने लावली जातात.
याला सभोवती केळीच्या पानांचा रुंद पट्टा आधारासाठी वापरला जातो. यानंतर रिंग कड्याला लावलेल्या तुंगुसच्या सहाय्याने पाने सरगाठ बांधून आवळण केली जाते.
पाने सांगोला, लातूर, संभाजीनगर, पंढरपूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, खेड, लांजा, फोंडा, कणकवली आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी एजंटांकडून पाठविण्यात आली. पान उत्पादकांना मात्र केवळ सणानिमित्त वाढलेल्या बाजारभावापेक्षा कायम बाजारात तेजीची अपेक्षा आहे.
अधिक वाचा: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणांची सुवर्णसंधी.. वाचा सविस्तर