तुषार हगारे
भिगवण: केळी पिकाला सध्या टिकून असलेला दर आणि खानदेशातील केळीचे घटलेले क्षेत्र यामुळे आखाती देशात वाढत असलेल्या मागणीमुळे इंदापूर तालुक्याच्या ऊस पट्टयात केळीची लागवड करण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे.
केळी हे पीक दीर्घकालीन असल्याने सध्याच्या दरामुळे उसापेक्षा अधिक उत्पादन देणारे पीक ठरत आहे. उजनी पाणलोट क्षेत्रालगत असणाऱ्या डिकसळ, कुंभारगाव, भादलवाडी, डाळजपासून ते धरण क्षेत्रापर्यंतच्या ऊस पट्टयात दिवसेंदिवस केळीचे क्षेत्र वाढत चालले आहे.
केळीची लागवड केल्यापासून सहा महिन्यांमध्ये केळीची वेण सुरू होऊन झाडाचे घड काढणीयोग्य होण्यास ३ ते ४ महिने वेळ लागत असल्याने वर्षभरात नफा देणारे पीक ठरत आहे.
सध्या आखाती देशामध्ये केळीची निर्यात सुरू असल्याने दरही चांगले मिळत आहे. निर्यातक्षम केळी २८ ते ३२ रुपयांपर्यंत व्यापारी शेतातच खरेदी करत आहे. वातावरणाच्या बदलामुळे केळीच्या दरात चढ-उतार होत राहतात.
सध्या मागील दोन वर्षांपूर्वी केळी सरकारकडून निर्यात बंद केल्यानंतर केळीचे दर पडले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना बागा काढाव्या लागल्या. मोठी आर्थिक झळ शेतकरी वर्गाला सोसावी लागली होती.
तरीदेखील आज ना उद्या दर वाढतील या आशेने शेतकरी केळी लागवड करत राहिले. सध्या आखाती देशामध्ये केळीची निर्यात सुरू असल्याने दरही चांगले मिळत आहे. यंदा मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस आले आहेत.
इंदापूर तालुक्यात दोन ते तीन हजार एकरच्या आसपास केळीची लागवड आहे. दिवसेंदिवस लागवड वाढत चालली आहे. सध्या निर्यातक्षम केळीला २७ ते ३२ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. उसापेक्षा अधिकचा नफा मिळत असल्याने केळी पिकाकडे वळलो आहे. सध्या दोन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. - माउली धुमाळ, केळी उत्पादक कुंभारगाव