राज्यभर सोयाबीन कापणीला सुरुवात झाली आहे. एकाबाजूला पावसाअभावी माना टाकलेल्या सोयाबीनवर हवामान बदलामुळे रोग पडला. तर दुसरीकडे एका कापणी यंत्राची किंमत १० हजार ते १६ हजारांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दहा दिवसांपासून काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु, सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. जे मिळताहेत त्यांनी मजूरी वाढवली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक गर्तेत सापडले आहेत.
रब्बी पिकांच्या पेरण्यांपूर्वी खरिप पिकांची काढणीला वेग आला आहे. मात्र, सोयाबीन कापणीसाठी वापरले जाणारे काढणी यंत्र १६ हजाराच्या घरात गेल्याने शेतकऱ्यांना हा खर्च वाचवण्यासाठी मजूर शोधावे लागत आहेत. इथेही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत असून मजूर शोधण्यासाठी वणवण करावी लागत आहेत. जे मजूर मिळतात त्यांनी मजूरी वाढवली आहे. रोजंदारीवर मजूर लावयचे तर त्यांनाही ५०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. सोयाबीनसाठी ४ ते ६ हजार रुपये मजूरी द्यावी लागत असल्याचे शेतकरी सांगतात.
सोयाबीन कापणीसाठी तीन प्रकारचे मळणी यंत्र वापरण्यात येत असून त्यांची किंमत १० हजार, १३ हजार व १६ हजार अशा आहेत. सध्या सोयाबीन कापणीचा काळ सुरू असून शेतकरी १३ ते १६ हजारांमधील यंत्र घेत असल्याचे मळणीयंत्र विक्रेत्याने सांगितले. मात्र, सध्या ही खरेदी करणे किती शेतकऱ्यांना करणे शक्य आहे याविषयी शंका असून अनेक शेतकरी कापणीसाठी मजूरीच देत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.
राज्यात सोयाबीन हे खरीपातले मुख्य नगदी पीक. यंदा एकूण ५० लाख ६४ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली. आधी उशीराने झालेला पाऊस नंतर ऐन बहराच्या काळात दीड महिन्याचा पावसाच्या खंडाने सोयाबीन पिकाने माना टाकल्याचे चित्र होते.खंडानंतर झालेल्या पावसाने पिकांना काहीसा दिलासा मिळाला खरा पण पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. आता सोयाबीन काढणीला राज्यभरात सुरुवात झाली आहे. असलेल्या सोयाबीनला विकून चार पैसे मिळतील आणि किमान उत्पादनाचा तरी खर्च निघावा अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
सोयाबीन काढणीसाठी एका बॅगसाठी लागणारी मजूरी, मळणी यंत्रातून सोयाबीन काढण्यासाठी एका क्विंटलमागे मळणी यंत्र चालकांना ४०० रुपये द्यावे लागत आहेत. नगदी पीक म्हणून उसनवारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. काल सोयाबीनला बाजार समितीत सरासरी ४२७० क्विंटल भाव मिळाला असून ३९५० ते ४५९५ रुपये भाव सोयाबीनला भाव मिळाला. सोयाबीन पेरणीपासून काढणीपर्यंत उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होताना दिसत असल्याने पुढच्या वर्षी सोयाबीन घ्यायचे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.