सतीश घनमोडे
शेतात लागणाऱ्या औजारांपासून ते घरी उपयोगात येणाऱ्या लहान मोठ्या सर्व वस्तू लाकडापासून बनविल्या जात होत्या. यावर आधारलेला सुतार व्यवसायही मोठ्या प्रमाणात होता. मात्र, अलीकडे घरातील लहानसहान वस्तूपासून ते शेती व्यवसायात यंत्राचा वापर वाढल्याने सर्व लाकडी औजारे इतिहासजमा होताना दिसत आहेत. अंगी कारागीराचे गुण असतानाही उदरनिर्वाहासाठी सुतारबांधवांना पर्याय म्हणून रोजंदारी करावी लागत आहे.
शेती व्यवसायावर आधारलेली ग्रामीण संस्कृती. यात सुताराचे महत्त्वाचे स्थान होते. शेतकऱ्याला आवश्यक असणारी औजारे बनविणे व दुरुस्त करण्याचे काम सुतार बांधवांकडे असायचे. काही काळापूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी सर्व औजारे सुतार समाजाकडून बनवून व दुरुस्ती करून घेत असे.
जसे की नांगर, बैलगाडी, तिफन, वखर आदी औजारे सुतार बनवीत असत. दारे, चौकटी, खिडक्या, पलंग, दिवाण, सोफा व घरातील शोभेच्या इतर वस्तू सुतारच करीत होते. मात्र, आधुनिकीकरणाच्या युगात पारंपरिक व्यवसाय डबघाईस आला आहे. बदलत्या काळात दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच लाकडी दारे, खिडक्या, घरातील शोभेच्या वस्तू लाकडाऐवजी लोखंड, स्टील व पत्र्याच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत.
लाकडी वस्तूची मागणी कमी झाली आहे. मजबूत व टिकाऊ घर बांधण्यासाठी माणसाने लोखंड व पत्र्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय घरावर लाकडाच्या जोडणीऐवजी स्लॅब दिसून येत आहेत. घराघरातील लाकडी वस्तूही लोखंडाच्या दिसून येत आहेत. घराचे दरवाजे आणि खिडक्याही लाकडाच्या बनविण्याऐवजी लोखंड आणि स्टीलच्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे तर सुतार व्यवसाय अडचणीत आला आहे.
शेतीची कामेही यंत्राच्या साह्याने होऊ लागली
रब्बी व खरीब पेरणीअगोदर शेतीची औजारे शेतकरी सुताराकडून बनवून घेत असे. जुन्या औजारांची दुरुस्ती करायची झाली तर सुताराकडेच जावे लागत असे. परंतु, हल्ली शेतीची सर्वच कामे यंत्राच्या साह्याने होऊ लागल्याने सुताराच्या हाताला कामच उरले नाही. परिणामी पारंपरिक सुतार व्यवसायाला घरघर लागली आहे.
रोजंदारीवर जाण्याची येतेय वेळ
पूर्वी शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या धान्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आम्ही करत होतो. मात्र, लोखंड व स्टीलच्या जमान्यात आमचा व्यावसाय बसला आहे. आज आम्हाला रोजंदारीवर जाण्याची वेळ आली आहे. - रमेश घनमोडे सुतार व्यावसायिक
वेगवेगळ्या लाकडापासून दारे, खिडक्या, दरवाजे, टेबल, खुच्र्चा, कपाटे, पाट, चौरंग, शेतीची औजारे तयार करून विकणे, लाकडी खेळणी व गरजेच्या वस्तू तयार करून ग्रामीण जनतेच्या गरजा भागाविण्याचे काम आम्ही पिढ्यानपिढ्या केले. परंतु, हल्ली हे काम सुताराकडे येत नाही. - मारोतराव वालमारे, सुतार व्यावसायिक