नाशिक जिल्ह्यातील रब्बी हंगाम पाणीटंचाईच्या झळांनी ग्रस्त झाला आहे. यंदा जिल्ह्यात हरभरा, कांदा लागवड वाढली असून, पाण्याअभावी शेकडो हेक्टर जमीन पड़िक ठेवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांकडून शेततळ्याच्या पाण्यावर रब्बी हंगाम उभा केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची भीषण समस्या उदभवणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 59 टक्के पेरणी झाली आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांची तहान टँकरने पुरवठा होणाऱ्या पाण्याने भागवली जात आहे. पावसाच्या पाण्यावरच शेतीचे भवितव्य अवलंबून असते. दिवाळी दरम्यान पाऊस झाला, तर रब्बीसाठी तो फलदायी असतो. मात्र आता पाणीटंचाईमुळे आशा शेततळ्यांवर आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना शेततळ्यात पाणी भरणेही शक्य झाले नाही. त्यांना आता जमीन पडिक ठेवावी लागली आहे. जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रही अल्प आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख 35 हजार तर रब्बीचे क्षेत्र एक लाख 13 हजार हेक्टरच्या आसपास आहे. एक हजार 633 गावांपैकी जेमतेम 110 गावे म्बी हंगामाची असून, दीड हजारांहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे.
नाशिक जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाल्यास खरिपाच्या पेरण्या शंभर टक्क्यापेक्षा अधिक होतात, अन्यथा रब्बी हंगाम अडचणीत येतो. दुष्काळी भागातही निफाड, दिंडोरीप्रमाणेच बागायत फुलत आहे. यंदा तर पावसाळ्यातही जलस्रोत कोरडेच राहिल्याने खरिपाचीच वाट लागली. ऐन पावसाळ्यात देवळा, नांदगावसारख्या दुष्काळी तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू होता, येवल्यासह मालेगाव, सिन्नर या तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.
पीक पॅटर्न बदलला
यावर्षी जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र घटले असून, पीक पॅटर्नही बदलताना दिसतोय. कांदा, हरभरा या पिकांचे क्षेत्र वाढताना गहू व रब्बी मका पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. आजपर्यंत गव्हाची 44 टक्के पेरणी झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मक्याच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. उन्हाळ कांद्याचे पीक भूतकऱ्यांना हक्काचे वाटते, म्हणून कोलवे, कुपनलिका व शेततळ्यांच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्राधान्य उन्हाळ कांदा लागवडीला दिले आहे. या खालोखाल थंडीसह थोड्याफार पाण्यावर येणाऱ्या ज्वारीकडे कल असून, शेती पडिक ठेवण्यापेक्षा थंडीच्या थोड्याफार ओलावर येणाऱ्या हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाली आहे. अवर्षणप्रवण व दुष्काळी भागात हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.