Join us

पाणी टंचाईमुळे उन्हाळी कांदा लागवड निम्म्यावर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 3:08 PM

येवला, वैजापूर, नांदगाव, चाळीसगावमधून जाणारे मन्याड पात्र खाली

- रविंद्र शिऊरकर 

नाशिकच्या उत्तरेस पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. येवल्यातील रहाडीमधून उगम होणारे मन्याड धरण व त्याला जोडून मराठवाड्याच्या वैजापूर तालुक्यातील वडजी, नारळा, भादली, नांदगाव तालुक्यातील  गावांना पिण्याच्या आणि शेतासाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे. गिरणा आणि तापीमध्ये समाविष्ट होणारे मन्याड नदी पात्र यंदा पावसाच्या कमतरतेमुळे अल्प भरले होते. सध्या या पात्रात पाणी नसल्याने यावर अवलंबून असणाऱ्या जिरायत शेतीत उन्हाळी कांदा लागवडीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. 

उपलब्ध पाण्याचा वापर बघता मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात पूर्वी १ एकर कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी टंचाईमुळे चालू हंगामात अर्धा एकर तर काहींनी अवघ्या १०-१५ गुंठे जमिनीत कांदा लागवड करताना दिसून येत आहेत. या परिसरात उन्हाळी भुईमूग देखील मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मात्र यावर्षी भुईमूग लागवडदेखील घटली असून शेतकऱ्यांचे खरिपात झालेले नुकसान व कमी उत्पन्न याची भर रब्बी काढेल ही अपेक्षा आता फोल ठरतेय की काय अशी परिस्थिती आहे. गेल्या वर्षी चार एकर कांदा लावलेला होता. मात्र, या वर्षी नदी पात्राला लगतचं विहीर असून सुद्धा विहिरीला हवे तेवढे पाणी नव्हते.त्यामुळे अवघे दीड दोन एकर कांदा लागवड केली आहे. यातही कांद्याला चांगला बाजार मिळाला नाही तर कर्जबाजारी व्हावं लागेल. जिरायत पट्टा असूनसुद्धा आमच्या संपूर्ण भागात सध्या प्रत्येक शेतकऱ्यांचे काही न काही शेत पडीक आहे. - सुनील कोल्हे कांदा उत्पादक शेतकरी सावरगाव ता. नांदगाव जि. नाशिक 

टॅग्स :कांदापाणी टंचाई