यशवंत परांडकर
हिंगोली : राज्याच्या दुग्धव्यवसाय विकास विभागातील ८२१ अस्थायी आणि १६५ अशा एकूण ९८६ पदांना सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने २७ सप्टेंबर २०२४ रोजी घेतला आहे.
अध्यादेशानुसार दुग्धव्यवसाय विकास विभागातील ८२६ अस्थायी पदे आणि १७१ अतिरिक्त पदांना मार्च २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीसाठी शासनाची मान्यता मिळाली होती. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त असणारी पदे वगळण्यात आली आहेत. सुधारित आकृतिबंधानुसार आवश्यक प्रस्तावित पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
या अध्यादेशात राज्यातील ४१ दूध योजना, विविध कार्यालयांतील पदांचा तपशील दर्शविण्यात आला आहे. बृहन्मुंबई, आरे, वरळी आणि कुर्ला या चार ठिकाणी सर्वाधिक एकूण २३३ अस्थायीपदे व ८८ अतिरिक्त पदांना मुदतवाढ मिळाली आहे. दुग्धव्यवसाय विभागाच्या वैयक्तिक विभागातील पाच अस्थायी पदे आणि बृहन्मुंबई, आरे, वरळी आणि कुर्ला या चार ठिकाणच्या सहा अतिरिक्त पदांना म्हणजेच एकूण ११ पदांना मुदतवाढ मिळाली नाही.
...अशी आहे संख्या
ठिकाण | अस्थायी पदे | अतिरिक्त पदे |
गंगाखेड आणि हिंगोली | ७ | ६ |
छत्रपती संभाजीनगर, कन्नड, जालना, वैजापूर आणि सिल्लोड | २१ | ६ |
नांदेड आणि नरसी | १० | १२ |
भूम आणि परांडा | ७ | ५ |
बीड, अंबाजोगाई, केज, माजलगाव | १२ | १२ |
उदगीर, धाराशिव, उमरगा, मुरुड, निलंगा | २४ | १८ |
एकूण | ८१ | ५९ |