पाणी टंचाईमुळे सध्या शेतातील कामे संपल्याने आता हाताला काम नाही. त्यामुळे घरबसल्या महिलांनी आंबट-गोड चिंचांच्या माध्यमातून रोजगार शोधला आहे. सावलीत बसून ३०० रुपये रोज मिळत आहेत. ग्रामीण भागातील ठिकठिकाणी महिला, मुली एकत्र येऊन चिंचा गोळा करण्यापासून फोडण्याचे काम करीत आहेत.
सध्या अनेक भागात आता शेतातील सर्व कामे उरकली आहेत. उन्हाळ्यात हाताला काम नसल्याने मजूर महिलांना प्रपंच कसा चालवावा? असा प्रश्न पडतो. तेला, मीठाला आपला हातभार लागावा म्हणून महिला सध्या चिंचांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करीत आहेत. चिंचा गोळा करण्यासाठी ३०० रुपये रोज दिला जातो.
तर त्याच चिंचा फोडण्यासाठी चिंचोक्यांवर पैसे ठरवून दिले जातात. घरी बसण्याऐवजी व्यापारी चिंचा घेऊन महिलांकडे देतात. गाव व परिसरातील महिला एकत्र येऊन दिवसभर चिंचा फोडतात. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी
दरम्यान, सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चिंचेचा हंगाम सुरू आहे. तसेच चिंचांचा मूल्यवर्धन उद्योग देखील सुरू आहे. यातून व्यापारी व गरजवंत मजुरांना काम मिळत असल्याचे बीडसांगवी येथील व्यापारी अमोल दिवटे यांनी सांगितले.
असा मिळतो रोजगार
सध्या चिंचा झोडण्यासाठी पुरुषाला ६०० रुपये, तर चिंचा गोळा करण्यासाठी महिलांना ३००, आणि घरी आणल्यावर पाच किलोंना १८० रुपये याप्रमाणे महिलांना पैसे दिले जातात. यातून अनेकांना रोजगार भेटल्याने मजूर देखील आनंदी आहे.