दसऱ्याला एकीकडे सोन्याचे दर ६० हजारांच्या वर गेले आणि त्याचवेळी झेंडूचे दर मात्र कमालीचे कोसळले होते. झेंडूचे दर पडल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चही निघाला नाही. यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली होती. आता दिवाळीत तरी झेंडूला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची आशा आहे.
रस्त्यावर टाकून दिली फुले
भाव मिळत नसल्याचे पाहून विविध रस्त्यांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले फेकून दिल्याचे दिसून आले. परिणामी, दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी मोंढ्यात शेतकऱ्यांनी फेकलेली फुले दिसत होती.
दसऱ्याच्या आदल्या दिवशी ५० रुपये किलो
नुकत्याच झालेल्या २ दसऱ्याच्या सणाच्या आदल्या दिवशी रस्त्यावर विक्रीसाठी आलेल्या झेंडूला प्रति किलो ४० ते ५० रु. दर मिळाला.
दसऱ्याच्या सकाळी ३०, संध्याकाळी कचरा
दसयाच्या आदल्या दिवशीपासून शहरातील विविध रस्त्यांवर झेंडूची फुले शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणली होती. दसऱ्याच्या दिवशी सकाळी ३० रुपये प्रति किलो दर मिळाला. मात्र दुपारनंतर दर कोसळत सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत या फुलांचा कचरा झाल्याचे दिसून आले.
आपट्याच्या पानांनी दिला दिलासा
झेंडूच्या तुलनेत आपट्याच्या पानांनी भाव खाल्ला. दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून परस्परांना दिली जातात. झेंडूच्या फुलांप्रमाणेच सकाळपासूनच विविध रस्त्यांवर आणि कर्णपुरा यात्रेत आपट्याच्या फांद्या विक्रीसाठी आल्या होत्या. दहा रुपयांना एक फांदी होती
वाहन खर्चही निघाला नाही
आम्ही सहा गुंठे क्षेत्रात झेंडूची लागवड केली होती. दसऱ्याला मोंढ्यात झेंडू विक्रीसाठी नेला. तेथे गेल्यावर झेंडूचे दर कोसळल्याचे दिसले. शेवटी पाच ते सहा रुपये प्रति किलो या दराने झेंडूची विक्री केली. यातून आलेल्या पैशातून आमच्या वाहनाचा खर्चही निघाला नाही.