साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी मंत्री समितीची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गळीत हंगामाची दिशा ठरवली जाणार असून कारखाने कधी सुरू करायचे याबाबत निर्णय होणार असल्याने कारखानदारांचे लक्ष लागले आहे. साधारणत: दसऱ्याच्या मुहूर्तावर मोळी आणि १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने उसांच्या वाढीवरही परिणाम दिसत आहे. परतीचा पाऊसही न झाल्याने माळरानावरील ऊस पिके अडचणीत आली आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम सुरु होत आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी वाढवलेली गाळप क्षमता आणि उसाचे उत्पादन यामुळे यंदा पूर्ण क्षमतेने हंगाम चालवताना कारखान्यांची पुरती दमछाक उडणार आहे.
गळीत हंगाम कधीपासून सुरू करायचा यासाठी आज मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होत आहे. यामध्ये कारखान्यांनी मागील हंगामातील गाळप केलेल्या उसाचा हिशेब शेतकऱ्यांना किती दिला, याचा प्रामुख्याने आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह सहकार सचिव, साखर आयुक्त आदी उपस्थित राहणार आहेत. साधारणत: दसऱ्याच्या मुहूर्तावर उसाची मोळी पूजन होईल. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे हंगामापुढे पेचमागील गळीत हंगामातील चारशे रुपये द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारपासून अत्मक्लेश पदयात्रा सुरू केली आहे, २२ दिवस ही यात्रा सुरू राहणार असून ७ नोव्हेंबरला ऊस परिषदेत सांगता होणार आहे. यंदा ऊस दराचे आंदोलन पेटणार हे निश्चित असल्याने हंगामापुढे पेच निर्माण होऊ शकतो.