भारतीय अन्न महामंडळ, प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र यांनी ओएमएसएस (डी) अर्थात खुला बाजार विक्री योजना (स्थानिक) अंतर्गत, जून २३ च्या शेवटच्या आठवड्यापासून (२८ जून २०२३) गहू आणि तांदूळ, विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे.
गहू आणि तांदूळ साठा खरेदी करु इच्छिणारे खरेदीदार, एफ सी आय च्या "m-Junction Services Limited" (https://www.valuejunction.in/fci/) या ई-लिलाव सेवा प्रदाता सुविधेवर स्वतःची नावनोंदणी करून खरेदीसाठी बोली लावू शकतात. खरेदीदारांच्या नावनोंदणीची आणि खरेदीदार म्हणून नोंदणीकृत होण्याची संपूर्ण प्रक्रिया, ७२ तासांच्या आत पूर्ण केली जाईल. प्रक्रिया उद्योजक/पीठ गिरण्या/गहू उत्पादनांचे उत्पादक आणि व्यापारी/घाऊक खरेदीदार/तांदूळ उत्पादक यामध्ये सहभागी होऊ शकतात.
२३.०८.२०२३ रोजी होणाऱ्या लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशातील २५ गोदामांतून १०,००० मेट्रिक टन गव्हाचा आणि ३४ गोदामांतून २०,००० मेट्रिक टन तांदूळाचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ओएमएसएस (डी) योजनेमुळे, वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळून, सर्वसामान्यांना मोठा दिलासाही मिळू शकेल.