पुणे : गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना रविवारी (दि. २९) प्रति हेक्टरी ५ हजारांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. मात्र, अद्यापही १९ लाख शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळे हे शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यातील २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी ५ हजारांचे (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कापूस व सोयाबीन पिकाची नोंद आहे. वनपट्टाधारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाही, अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही हा लाभ देण्यात येणार आहे.
खातेदारांच्या आधार संलग्न बैंक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून हे अर्थसाह्य जमा करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ९६ लाख खातेदारांपैकी ६८ लाख खातेदारांनी आपली आधार संमती दिली आहे. यापैकी 'नमो शेतकरी सन्मान निधी योजने' नुसार ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत. या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.
मात्र, उर्वरित २१.३८ लाख खातेदारांना आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यापैकी २.३० लाख खातेदारांनी २५ सप्टेंबरअखेर ई-केवायसी पूर्ण केली आहे. तर, शिल्लक १९ लाख खातेदारांसाठी https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक, पुणे.
अशी आहे ई-केवायसी प्रक्रिया
• ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही, अशांची यादी गावात लावण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकाशी संपर्क साधावा. कृषी सहायक त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाइल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून ई- केवायसी करतील.
• शेतकरी स्वतःही या पोर्टलवर जाऊन ओटीपीच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करू शकतात.