PM Kisan Scheme : विविध शासकीय योजना, बँकेच्या व्यवहारांसाठी आवश्यक असलेले केवायसीच्या नावाखाली दिवसाला किमान तिघांची फसवणूक होत आहे. सायबर पोलिस ठाण्यात प्राप्त दहा तक्रारींमागे किमान ३ तक्रारी या केवायसी अपडेटच्या शेतकरींची तक्रार येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रकरण - १ छत्रपती संभाजीनगर :
सायबर गुन्हेगार फसवणुकीच्या पद्धतीत नवनवीन प्रकार अंमलात आणत आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत सातत्याने जनजागृती होते. मात्र, प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्याने आता सायबर गुन्हेगारांना बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शासनाने अनेक योजना, अनुदानासाठी केवायसी बंधनकारक केले आहे. त्यामुळे शेतकरी आधार केंद्राकडे धाव घेताना दिसत आहे.
प्रकरण - २. वाशिम :
बँकेचे व्यवहार ऑनलाइन झाल्याने अनेक समस्या सुटल्या आहेत. त्यासोबतच काही नवीन धोकेसुद्धा निर्माण झाले आहेत. ठगबाजांकडून नवी शक्कल लढवण्यात येते. बऱ्याचदा शासकीय योजनांच्या नावे फास टाकला जातो. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी अपडेट करण्याचा फास वापरला जात आहे. यातून कुणी अडकला, तर थेट त्याचे बँक खाते साफ केले जाते. फसवणुकीची ही नवी पद्धत सध्या प्रचलित होत आहे. सुदैवाने जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला असा फटका बसलेला नाही.
प्रकरण- ३ धाराशिव :
ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, कहर म्हणजे पीएम किसान योजनेचे ई- केवायसी करा असे सांगून फसविण्याचे प्रकार घडले आहेत. काही शेतकऱ्यांना सौरपंपासाठी रक्कम भरण्याची बोगस लिंक पाठवून रक्कम हडप केली आहे. नऊ महिन्यांत जिल्ह्यातील ७८ शेतकऱ्यांची अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणुकीनंतर काही शेतकऱ्यांनी तातडीने तर काही शेतकऱ्यांनी एक महिन्यानंतर तक्रार नोंदवली आहे.
अमिषाला बळी पडून किंवा माहिती नसल्याने सायबर क्राइम किंवा ऑनलाइन फसवणुकीला बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तुमची फसवणूक झाल्यास तुम्हाला तातडीने सायबर क्राइमकडे तक्रार करता येते.
सायबर भामट्यांनी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात सौरपंपाचे पैसे भरण्यासाठी लिंक पाठवून व त्यानंतर ई-केवायसीचे कारण सांगून ओटीपी घेत ७८ पेक्षा अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत.
फसवणुकीची नवीन पद्धती
सायबर गुन्हेगारांनी याही प्रक्रियेचा गैरफायदा घेत शेतकरी, सर्वसामान्यांना फसवण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार फसवणुकीच्या पद्धतीत नवनवीन प्रकार अंमलात आणत आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत सातत्याने जनजागृती होते.
मात्र, प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्याने आता सायबर गुन्हेगारांना बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शासनाने अनेक योजना, अनुदानासाठी केवायसी बंधनकारक केले. मात्र, सायबर गुन्हेगारांनी याही प्रक्रियेचा गैरफायदा घेत शेतकरी, सर्वसामान्यांना फसवण्यास सुरुवात केली आहे.
ई-केवायसीच्या नावे फसवणूक
• सायबर पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अंमलदार नितीन देशमुख यांच्या माहितीनुसार, केवायसीसारख्या प्रचलित संकल्पनांसाठी
संपर्क केल्यावर सामान्य सहज विश्वास ठेवतात.
• सायबर गुन्हेगारांकडे संपर्क केला गेलेल्याची सर्व माहिती उपलब्ध असते. ती सांगितल्याने नागरिकांचा अधिक विश्वास बसतो. त्यानंतर फसवणुकीची
प्रक्रिया सुरू होती.
शंभरामागे १५ तक्रारी
छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाण्यातील अंमलदार वैभव वाघचौरे यांच्या निष्कर्षानुसार, सायबर गुन्हेगार सातत्याने फसवणुकीचे प्रकार बदलत आहेत. शहरात शेतीच्या योजनांसाठी केवायसी फसवणुकीच्या तक्रारी कमी येतात; परंतु सर्वसाधारण केवायसी करण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे शंभरामागे किमान १५ तक्रारी असतात.
अनोळखी व्यक्तीस प्रतिसाद देऊ नका
अनोळखी व्यक्ती संपर्क करून केवायसी करण्यासाठी विचारणा करत असेल, तर प्रतिसाद देऊ नका. केवायसीसारखी प्रक्रिया अनोळखी किंवा एका कॉलवर होत नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नोंदणीकृत संकेतस्थळावरून तुम्ही ही करू शकता. विश्वासार्ह, ओळखीच्या व्यक्तीची यासाठी मदत घ्या. -सत्यजित ताईतवाले, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे(ग्रामीण)
ई-केवायसी किंवा इतर अपडेटसाठी बँकेत जाणे कधीही सुरक्षित आहे. कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडू नये. फसव्या संदेशापासून शेतकऱ्यांनी
खबरदारी घ्यावी. - प्रमोद इंगळे, सायबर सेल प्रभारी, वाशिम.
नागरिकांनी बँकेसह अन्य गोपनीय माहिती फोनवर कोणालाही देऊ नये. बँकेसंबंधी कोणतेही काम प्रत्यक्ष बँकेत जाऊन करावे. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांना कळवावे. यामुळे तपास करण्यास फायदा होतो. - गणेश कानगुडे, पोलिस निरीक्षक सायबर
अशी घ्या काळजी!
■ ई-केवायसी आणि अपडेटच्या नावाने लिंक पाठवून अर्ज भरून घेतले जातात. ठगबाजांचा हा नवा फास आहे. अशा प्रकारे कुणीही गुगलवरचा फॉर्म भरू नये.
■ बँकसंदर्भातील कुठलाही व्यवहार किंवा अपडेटचे काम थेट बँकेत जाऊनच करावे.
■ बँक खात्यासंदर्भातील माहिती ओटीपी, पीन, डेबीट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती कुणालाही देऊ नये.
■ १९३०, १५५२६० या क्रमांकांवर कॉल करून तक्रार नोंदवावी.
स्क्रिन मॉनिटरिंग करून घेतात
• एखादी लिंक अथवा एपीके इंस्टॉल करण्यात आले, तर ठगबाज मोबाइल वापरातील सर्व माहिती घेत असतात.
• अशा स्थितीत बँकेचा व्यवहार केल्यास गोपनीय माहिती ठगबाजांना मिळते व ते बँक खाते साफ करतात.
फसवणुक झाल्यावर काय करावे
■ ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक मोबाइलधारकांनी बँक किंवा अन्य कामासाठी ओटीपी नंबर सांगा म्हणून फोन आल्यास बोलणे टाळावे.
■ संबंधिताचे खाते सील करून रक्कम परत मिळवता येते.
■ प्रथम सायबर पोलिस ठाण्यांत मध्ये जाऊन तक्रार नोंदवावी.